मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपूजेची गाणी वाजवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती, ठाकरे गट शिवसेना आणि मनसेने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. रेल्वेने उत्तर भारतीय मतदारांना खूश करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
मुंबई आणि आसपासच्या रेल्वे स्थानकांवर छठपूजेच्या निमित्ताने भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याने महाराष्ट्रात राजकीय वादंग निर्माण झाले आहे. हार्बर आणि मध्य मार्गावरील वडाळा, सानपाडा आणि आंबिवली स्थानकांवर ही गाणी मोठ्या आवाजात लावण्यात आली होती. यामुळे मराठी भाषिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या प्रकारावर स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीने आक्षेप नोंदवत आरोप केला आहे. तसेच, ठाकरे गट शिवसेना आणि मनसेनेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “रेल्वे स्टेशन आहेत की डान्सबार?” असा सवाल किल्लेदार यांनी उपस्थित केला.
मध्य रेल्वे मराठी सणांकडे दुर्लक्ष करून उत्तर भारतीयांना खूश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. येत्या १३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान छठपूजा होणार असली तरी, रेल्वेने तीन-चार दिवस आधीच गाणी वाजवण्यास सुरुवात केली होती. रेल्वेने स्थानकांवरील उद्घोषणा थांबवून ही गाणी वाजवल्याचा आरोपही होत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका होत आहे. या वादावर रेल्वे व्यवस्थकांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सांगितले आहे की, कोणताही सण असेल तर गाणी लावली जातात. जर आवाज खूप मोठा असल्याची तक्रार असेल तर चौकशी होणार.
