शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
नांदेडमधील विभागीय दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदाम ठेवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करत असताना आणि पिके वाळलेली असताना, अशा बैठकीत सुखमेवा ठेवणे ही शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याची बाब असल्याचे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नांदेड येथे आयोजित विभागीय दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदाम ठेवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारावरून अधिकारी आणि सरकारवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पिके पूर्णपणे वाळून गेली आहेत, तर काही ठिकाणी पाणी आणि विजेच्या अभावामुळे शेती धोक्यात आली आहे. अशा स्थितीत दुष्काळाच्या बैठकीत काजू-बदाम ठेवणे हे तोंडदेखलेपणाचे आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणारे आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे.
अधिकऱ्यांनी केलेला हा प्रकार निष्क्रिय मंत्र्यांच्या कारभाराचे द्योतक आहे. शेतकरी आत्महत्या करत असताना अशा संवेदनहीन कृतीतून सरकारची अनास्था दिसून येते. कर्नाटक राज्याने दुष्काळ जाहीर केला असताना, महाराष्ट्र सरकार मुहूर्त शोधत आहे. तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
