पदासाठी घेतला लेकीचा जीव, कुठं चाललंय महाराष्ट्राचं राजकारण?
नांदेडमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी तिसरे अपत्य अडथळा ठरल्याने एका पित्याने आपल्या सात वर्षांच्या मुलीला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला तेलंगणात नेऊन कॅनॉलमध्ये फेकण्यात आले. या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून, महाराष्ट्रातील तीन अपत्यांच्या नियमामुळे हे कृत्य केल्याची चर्चा आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी तिसरे अपत्य अडथळा ठरल्याने एका पित्याने आपल्या सात वर्षांच्या मुलीला संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. आरोपी पांडुरंग कोंडा मंगले याने आपल्या दोन जुळ्या मुलींपैकी एका मुलीला तेलंगणा राज्यात नेऊन कट्टापल्ली परिसरातील कॅनॉलमध्ये फेकून दिले. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रामध्ये तीन किंवा त्यापेक्षा जास्त अपत्य असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढवता येत नाही असा नियम आहे. या नियमामुळे सरपंचपदाच्या निवडणुकीत अडथळा येऊ नये यासाठी पित्याने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. केरूर गावचे सरपंचपद ओबीसीसाठी राखीव होते आणि आरोपीला एक मुलगा व दोन जुळ्या मुली असल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. तेलंगणा पोलिसांनी तपास करून आरोपी पांडुरंग कोंडा मंगले याला ३० जानेवारी रोजी अटक केली आहे. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
