Sunil Kedar Resignation: महाजनांच्या कारभारावरुन नाशिक भाजपात कलह?
नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांनी गिरीश महाजनांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता, जो काही तासांत मागे घेतला. महापौर-उपमहापौर निवडीतील हस्तक्षेप आणि स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेतल्याने हा अंतर्गत कलह निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे नाशिक भाजपमधील असंतोष समोर आला आहे.
नाशिक भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी काही तासांसाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, जो नंतर मागे घेण्यात आला. या घटनेमुळे नाशिक भाजपमधील अंतर्गत नाराजी समोर आली आहे. गिरीश महाजन यांच्या एकतर्फी कारभारावर केदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. महापौर आणि उपमहापौर निवडीवरून हा वाद प्रामुख्याने निर्माण झाल्याची माहिती आहे. प्रदेश पातळीवरून आलेली नावे ऐनवेळी बदलून हिमगौरी आडके यांना महापौर आणि मच्छिंद्र सानप यांना उपमहापौरपदी निवडण्यात आले. या निवडींमध्ये गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे म्हटले जाते. स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याने आणि उपऱ्यांना पक्षात प्रवेश दिल्याने नाशिक भाजपमध्ये मोठी खदखद आहे. ही नाराजी धुळ्यात अनिल गोटेंनी गिरीश महाजनांच्या कारभारावर केलेल्या आरोपांसारखीच असल्याची चर्चा सुरू आहे.
Published on: Feb 05, 2026 10:21 AM
