दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
नाशिकमधील एका UPSC परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना काही मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेला प्रवेश नाकारण्यात आला. शहरातील खड्ड्यांमुळे उशीर झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. यामुळे संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ घातला. अनेक विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
नाशिक शहरातील के. व्ही. एन. नाईक कॉलेज येथील UPSC परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास केवळ दोन ते तीन मिनिटे उशीर झाल्याने त्यांना परीक्षेला बसण्यास प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी परीक्षा केंद्राबाहेर जोरदार निदर्शने केली. शहरातील खराब रस्ते आणि खड्डे यामुळेच परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.
अनेकांनी वर्षभर तयारी केली असून, काही मिनिटांच्या उशिरामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त केली. सकाळी ९:३० वाजता रिपोर्टिंगची वेळ असताना, काही विद्यार्थ्यांना ९:३० नंतर काही मिनिटांत पोहोचल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला. अन्य केंद्रांवर ९:४५ पर्यंत प्रवेश दिला जात असल्याचा दावाही विद्यार्थ्यांनी केला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल घटनास्थळी हजर होते. पालकांनी प्रशासनाकडे विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची मागणी केली.
