Umesh Patil on NCP | दादांनी उभ्या केलेल्या पक्षाच्या फांदीवर कुऱ्हाड चालवण्यात…; उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन

Umesh Patil on NCP | दादांनी उभ्या केलेल्या पक्षाच्या फांदीवर कुऱ्हाड चालवण्यात…; उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन

| Updated on: Aug 08, 2026 | 12:45 PM

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दोन दिवसांपूर्वी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या भेटीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सध्या सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा धाडसी निर्णय घेणार का, याबाबतही राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी स्पष्टपणे मांडली आहे. “दोन ते तीन वर्ष झाली आहेत. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजेत,” अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि प्रवक्ते उमेश पाटील यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

उमेश पाटील यांनी आपल्या पोस्टमधून अजित पवार यांच्या समर्थकांना आणि पक्षातील काही नेत्यांना सूचक सवाल केला आहे. “दादांवरचं प्रेम खरं होतं, तर दादांच्या माघारी त्यांच्या परिवारावरचं प्रेम कमी कसं होऊ शकतं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अजित पवारांवर निस्सीम प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते आजही त्यांच्या परिवारासोबत निःस्वार्थपणे उभे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना काय दिले, किती प्रेम दिले आणि किती जपले, याची जाणीव ठेवून त्यांच्या पश्चात “दादांचा परिवार हाच आपला परिवार” या भावनेने कार्यकर्त्यांनी उभे राहावे, असेही उमेश पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र, अजित पवार यांच्या नावावर, त्यांच्या विश्वासावर आणि त्यांनी दिलेल्या संधींवर मोठे झालेले काही लोक त्यांच्या परिवाराला मानसिक त्रास होईल असे वातावरण निर्माण करत असतील, तर त्यांच्यावर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.

“यांचं दादांवर खरंच प्रेम होतं का? की दादा सत्तेत होते, तोपर्यंतच ते प्रेम होतं?” असा थेट सवाल उमेश पाटील यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या या पोस्टचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

उमेश पाटील यांनी पुढे अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर आलेल्या परिस्थितीचाही उल्लेख केला आहे. ज्याचं अजितदादांवर खरं प्रेम होतं, त्याचं त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारावर तेवढंच नव्हे, तर कणभर अधिक प्रेम असायला हवं, अशी आपली धारणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांच्या अचानक निधनामुळे केवळ महाराष्ट्राने एक नेता गमावला नाही, तर एका कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य एका क्षणात बदलले, असेही उमेश पाटील यांनी नमूद केले. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्याला अचानक वेगळे वळण मिळाले. विशेषतः सुनेत्रा पवार यांना स्वतःच्या दुःखातून सावरण्यासाठीही पुरेसा वेळ मिळाला नाही. अश्रू पुसण्याआधीच पक्ष आणि सरकारची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली, अशी भावनिक भूमिका उमेश पाटील यांनी मांडली.

प्रशांत किशोर यांची सुनेत्रा पवारांसोबतची भेट, प्रदेशाध्यक्ष बदलण्याची सुरू झालेली चर्चा, रुपाली ठोंबरे यांची मागणी आणि आता उमेश पाटील यांची सूचक सोशल मीडिया पोस्ट यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. त्यामुळे उमेश पाटील यांच्या पोस्टमधून नेमका कोणाला संदेश देण्यात आला आहे आणि प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेवर पक्ष नेतृत्व काय निर्णय घेणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 08, 2026 12:45 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us