Imtiaz Jaleel | मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री काय पोलीस आहेत का? म्हणत जलीलांचा पलटवार
नाशिकमधील आयटी कंपनीशी संबंधित धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या निदा खान प्रकरणावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक करण्यात आल्यानंतर राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय शिरसाट यांनी, “निदा खानला लपवून ठेवण्यासाठी इम्तियाज जलील यांनी मदत केली. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी केली. त्यांच्या या आरोपांनंतर इम्तियाज जलील यांनीही माध्यमांसमोर येत जोरदार प्रत्युत्तर दिले.
“निदा खानला जणू दहशतवादी असल्यासारखे दाखवले जात आहे. तिच्यावर सध्या फक्त आरोप आहेत, ती अद्याप दोषी ठरलेली नाही,” असे जलील म्हणाले. तसेच, “संजय शिरसाट काही पोलीस आयुक्त नाहीत. त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही,” असा पलटवारही त्यांनी केला. मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री काय पोलीस आहेत का? असं देखील जलील म्हणाले जलील यांनी पुढे सांगितले की, “निदा खान उच्च न्यायालयात गेली असती तर तिला नक्की जामीन मिळाला असता. पोलिसांनी एफआयआर दाखल केली असेल तर ते नियमानुसार कारवाई करतील. मी पोलिसांकडून संपूर्ण माहिती घेणार असून तपासात पूर्ण सहकार्य करेन. मात्र निदा खानला लपवून ठेवण्यात माझा हात असल्याचा आरोप चुकीचा आहे.” या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, आता या प्रकरणात पुढे कोणते नवे खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.