Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या आंदोलनावर झालेल्या पोलिस लाठीचार्जचा मुद्दा आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही गाजत आहे. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी या घटनेवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे थेट उत्तराची मागणी केली आहे.

संसद परिसरात माध्यमांशी संवाद साधताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी त्या आरएमएल रुग्णालयात गेल्या होत्या. त्याआधी केंद्रीय आरोग्यमंत्रीही रुग्णालयात जाऊन गेले होते. जखमी विद्यार्थिनीच्या आईने आपल्या मुलीची अवस्था पाहून तीव्र संताप व्यक्त केला असून, “ज्यांनी माझ्या मुलीची ही अवस्था केली त्यांनीही येथे यावे,” अशी भावना व्यक्त केल्याचे प्रियंका गांधी यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी सरकारला सवाल करत, विद्यार्थ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या का फोडल्या? लाठीचार्ज का करण्यात आला? मुलींचा अपमान का झाला? ते विद्यार्थी दहशतवादी होते का? असे प्रश्न उपस्थित केले. या घटनेची जबाबदारी निश्चित करून लाठीचार्जचे आदेश नेमके कुणी दिले, याचे उत्तर पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या की, हा प्रश्न केवळ काँग्रेस पक्षाचा नाही, तर संपूर्ण देशातील जनतेचा आहे. संसद ही देशाच्या जनतेची संस्था असून, सत्ताधारी लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने उत्तरदायी भूमिका घ्यावी आणि तरुणांचा आवाज दडपण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांना न्याय द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, CJP आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईबाबत राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असून, या मुद्द्यावरून संसदेतही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे.