मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले…
काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली. आपल्या राजकीय वाटचालीत काँग्रेसने दिलेल्या संधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, राहुल बोंद्रे यांनी नव्या राजकीय प्रवासाची घोषणा केली आहे.
काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे भारतीय जनता पक्षामध्ये (भाजप) प्रवेश करणार आहेत. बोंद्रे यांनी स्वतः फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे, विशेषतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आणखी एका शिलेदाराने पक्ष सोडल्याने. राहुल बोंद्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “माझ्या सामाजिक-राजकीय वाटचालीमध्ये काँग्रेस पक्षाने मला अनेक संधी दिल्या, अनेक पद दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवाभावाची अनेक माणसे दिली.
हर्षवर्धन दादांसारख्या नेत्यांनी मला एका भावासारखे आणि मित्रासारखे प्रेम दिले.” त्यांनी काँग्रेस पक्षाने दिलेल्या संधी आणि प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. पुढे ते म्हणाले, “आज राजकीय आयुष्याच्या या वळणावर मी एक वेगळा निर्णय घेतला असून, भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा माझा निर्धार आहे.” मात्र, त्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांनी आणि मित्रांनी दिलेल्या प्रेमाला कधीही विसरणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. राहुल बोंद्रे यांच्या या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसल्याचे मानले जात आहे.
