Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर… नेमकं प्रकरण काय?
राहुल गांधींनी भाजप आणि निवडणूक आयोगावर देशद्रोह आणि मतांची चोरी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात फौजदारी अवमानना कारवाईची मागणी करण्यात आली असून, निवडणूक आयोगातील कार्यपद्धती आणि सुधारणांवरून देशभरात चर्चा सुरू आहे.
राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगावर तीव्र शब्दांत हल्लाबोल करत, मतांची चोरी हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आणि संविधानावर झालेला थेट हल्ला असल्याचे म्हटले आहे. भाजपने आणि निवडणूक आयोगाने हे देशद्रोहाचे कृत्य केले आहे, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा देताना राहुल गांधी म्हणाले की, “तुम्ही जे करत आहात ते चुकीचे आहे, हा देशद्रोह आहे. वेळ आल्यावर आम्ही तुम्हाला पकडू, तुम्ही वाचणार नाही.” याचदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे वकील ब्रजेश सिंह यांनी ॲटर्नी जनरल व्यंकटरमणी यांना पत्र लिहून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात फौजदारी अवमानना कारवाईला परवानगी देण्याची मागणी केली आहे.
बहुसदस्यीय निवडणूक आयोग एकाच व्यक्तीच्या निर्णयानुसार चालवला जात असल्याचा आरोप ब्रजेश सिंह यांनी पत्रात केला आहे. सीजेपीचे अभिजित दिपके यांनीही निवडणूक आयोगात सुधारणा करण्याची मागणी केली असून, ज्ञानेश कुमार आता तुमचं काम तमाम अशी पोस्ट केली आहे. निवडणूक आयोगातील मतभेदांवर द इंडियन एक्सप्रेसने वृत्त प्रसिद्ध केले आहे.
