मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
राज्यातील राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे सकाळी आठच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षा’ येथे पोहोचले. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्यातील राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे सकाळी आठच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षा’ येथे पोहोचले. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे भाजप आणि केंद्रातील तसेच राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह नितीन गडकरी यांच्यावरही त्यांनी विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला आहे. जेन-झी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करतानाही राज ठाकरे आक्रमक भूमिका घेताना दिसले होते. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मनसेकडून जल्लोषही करण्यात आला होता.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल झाल्याची चर्चा आहे. मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आल्यापासून राज ठाकरे यांच्याकडून सरकार आणि भाजपवर टीकेची धार अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यातही त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज ठाकरे यांच्या या भेटीमागे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील जिमखान्याचा मुद्दा असल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीवेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक हे देखील राज ठाकरे यांच्यासोबत उपस्थित होते. त्यामुळे जिमखान्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
याशिवाय मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरही या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी स्वतः मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली होती. महामार्गाच्या कामाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या विषयावरही राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करू शकतात.
विशेष म्हणजे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही भेट अचानक ठरलेली नसून पूर्वनियोजित असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वीच या भेटीचे नियोजन करण्यात आले होते आणि त्यानुसार आज सकाळी राज ठाकरे ‘वर्षा’वर दाखल झाले. गेल्या काही दिवसांपासून भाजपवर टीका करणारे राज ठाकरे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमके कोणते मुद्दे मांडतात आणि भेटीनंतर त्यांची भूमिका काय असते, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
