Raj Thackeray | प्रधानांच्या मुलीचा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास आहे का? NEET पेपरफुटीपासून परदेशी शिक्षणापर्यंत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
नाशिक दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशातील शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. “आपल्या देशातील विद्यार्थी आपल्या देशाचं भविष्य आहे. त्यांच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. दरवर्षी आंदोलनं होत आहेत.
नाशिक दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशातील शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. “आपल्या देशातील विद्यार्थी आपल्या देशाचं भविष्य आहे. त्यांच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. दरवर्षी आंदोलनं होत आहेत. या शिक्षण पद्धतीला गांभीर्याने घेत नसाल आणि विद्यार्थ्यांनी चिडू नये, असं म्हणत असाल, तर शिव्या देऊ नये असं म्हणण्याचा अधिकार काय भाजपला आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नीट पेपरफुटी ही केवळ सुरुवात असून, “नीट ही सुरुवात आहे, अजून बघा काय काय होतंय,” असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.
शिक्षण व्यवस्थेतील खासगी क्लासेस आणि त्यातून निर्माण झालेल्या व्यवसायावरही राज ठाकरे यांनी टीका केली. “प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या झाल्या आहेत. प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचं आहे. शत्रू संपवण्याची प्रक्रिया भाजपमध्ये सुरू झाली आहे. पहिल्यांदा कॉलेजची भूमिका काय, धंदेवाईक क्लासेस सुरू झाले आहेत ते हटणार की नाही, सरकारचा कस तिथे लागला पाहिजे,” असे ते म्हणाले. खासगी क्लासेस आणि शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिकतेमुळेच अशा समस्या निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. पेपरफुटीच्या घटनांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत, वर्तमानपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात जाहिराती देऊन विद्यार्थ्यांच्या यशाचे मार्केटिंग केले जाते, मात्र परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांकडे दुर्लक्ष का केले जाते, असा सवाल केला.
नीट पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांबाबत सरकारने स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली. “सर्व गोष्टी सर्वांना माहीत आहेत. कोणी कंट्रोल करत नाही म्हणजे काय? सरकारचे लोक त्यात अडकले आहेत का? त्यात कोणी आहे का? या सर्व गोष्टींची उत्तरं सरकारने द्यावी,” असे ते म्हणाले. सरकारने केवळ आपल्यालाच सर्वकाही कळते या भूमिकेतून बाहेर पडून शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली, तरच या प्रश्नांवर ठोस उपाय निघू शकतो, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नंदन नीलेकणी यांच्यावर जबाबदारी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर “आता नीलेकनींना आणलं. माहीत नाही काय करतील,” असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी Gen-Z तरुणांशी संवाद साधल्याबाबतही राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “उशीर झाला. संवाद साधायला उशीर झाला,” असे ते म्हणाले. तरुणांच्या समस्या आणि त्यांच्या कुटुंबीयांवर येणारा आर्थिक व मानसिक ताण समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. “मुलं काय म्हणत आहेत हे समजून घेणार आहोत का? त्यांना आणि त्यांच्या आई-वडिलांना काय त्रास होतोय हे समजून घेणार आहोत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येचा मुद्दाही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. देशातील शिक्षण व्यवस्थेवर विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास राहिला नाही, तर भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते, असे त्यांनी सूचित केले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीच्या परदेशातील शिक्षणाचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी, “प्रधानांच्या मुलीचा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नसेल तर बाकीच्या मुलांचं काय?” असा सवाल केला. त्यामुळे नीट पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकार, खासगी क्लासेस आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी सरकारवर केलेली टीका चर्चेचा विषय ठरली आहे.
