Raj Thackeray | आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत, तरुणांसाठी नाहीत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले

Raj Thackeray | आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत, तरुणांसाठी नाहीत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले

| Updated on: Aug 01, 2026 | 1:05 PM

मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तरुणांच्या वाढत्या असंतोषावर भाष्य करत राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. NEET पेपरफुटी हे केवळ आंदोलनाचे निमित्त होते, मात्र त्यामागे तरुणांच्या मनात साचलेला रोष हा खरा कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे म्हणाले, “NEET पेपरफुटी हे आंदोलनाचं एक कारण होतं. पण रस्त्यावर उतरलेले सर्वजण विद्यार्थी नव्हते, त्यात मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी सहभागी झाले होते. त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून साचलेला असंतोष आता बाहेर पडत आहे.” त्यांनी सांगितले की, तरुणांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत, शहरांमध्ये मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत, शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही रोजगार उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे युवकांमध्ये नैराश्य वाढत आहे.

यावेळी त्यांनी सरकारच्या आर्थिक आणि औद्योगिक धोरणांवरही निशाणा साधला. “कंपन्या खासगी हातात दिल्या जात आहेत. एका उद्योगपतीवरच सरकारची विशेष मेहरबानी सुरू आहे. देशात विकासापेक्षा फक्त निवडणुका आणि आमदार-खासदार फोडण्याचे राजकारण सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, डिजिटल व्यवहारांचा उल्लेख करत त्यांनी आमदार-खासदारांच्या कथित खरेदी-विक्रीवरही उपरोधिक भाष्य केले.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, हा केवळ सत्तांतराचा प्रश्न नसून देशाच्या भविष्यासंबंधीचा विषय आहे. “हा कुणाला सत्तेवरून खाली खेचण्याचा किंवा कुणाला सत्तेवर आणण्याचा मुद्दा नाही. हा देशाच्या भविष्याचा आणि तरुणांच्या आयुष्याचा प्रश्न आहे,” असे ते म्हणाले.

ग्रामीण भागातील युवकांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधताना त्यांनी शेतकरी आत्महत्यांचा मुद्दाही उपस्थित केला. “शेजारच्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याचा मुलगा शहरात जाऊन नोकरी करण्याचं स्वप्न पाहतो. पण शहरातही नोकऱ्या नाहीत, राहण्यासाठी जागा नाही. स्मार्ट सिटीची घोषणा झाली, पण प्रत्यक्षात परिस्थिती बदलली का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि तरुणांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Aug 01, 2026 1:05 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us