Sanjay Raut | नीट पेपरफुटी प्रकरणात सरकारचं मौन, राऊत म्हणाले, याचा अर्थ भाजपचं नेटवर्क…

| Updated on: May 28, 2026 | 12:51 PM

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापलं असून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी नीट पेपरफुटी प्रकरणात सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका करत या संपूर्ण घोटाळ्यामागे भाजपच असल्याचा खळबळजनक आरोप केला.

संजय राऊत म्हणाले, “नीट पेपरफुटीचं केंद्र महाराष्ट्रात असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. लातूरपासून पुण्यापर्यंत या प्रकरणाचं जाळं पसरलेलं दिसत आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंड चेतन शाह याला सीबीआयने अटक केली आहे. महाराष्ट्रात कुठलंही मोठं गैरप्रकार घडलं की ‘शाह कनेक्शन’ समोर येतं,” असा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारवरही निशाणा साधला. “देशातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त होत असताना मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. त्यांनी यावर पत्रकार परिषद घ्यायला हवी होती, पण सरकार मौन बाळगत आहे. याचा अर्थ या पेपरफुटीमागे भारतीय जनता पक्षाचं नेटवर्क काम करत आहे,” असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.
तसेच, “आपल्या लोकांना आधी प्रश्नपत्रिका मिळाव्यात आणि त्यांना चांगले गुण मिळावेत यासाठी पेपरफुटीचं रॅकेट तयार करण्यात आलं. जसं भाजपने निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा आणि इतर संस्था ताब्यात घेतल्या, तसंच स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या यंत्रणांवरही नियंत्रण मिळवलं आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, वाढत्या इंधन दरवाढीवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. “जनतेवर इंधन दरवाढीचा बोजा टाकून पंतप्रधान परदेश दौरे करत आहेत. देशाची अर्थव्यवस्था गंभीर अवस्थेत आहे, पण सरकार जमिनीवर नसून हवेत आहे,” असं म्हणत राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

Published on: May 28, 2026 12:48 PM
Follow Us