Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट…
ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. पूर्णेकर यांच्या हत्येचा कट मीनाक्षी शिंदे यांच्या निवासस्थानी रचला असल्याचा आरोप राम पूर्णेकर यांनी पुरवणी जबाबात केला आहे.
ठाण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात मोठा राजकीय ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी नोंदवण्यात आलेल्या पुरवणी जबाबात शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावे समोर आली आहेत. पूर्णेकर यांचे चिरंजीव राम पूर्णेकर यांनी दिलेल्या जबाबानुसार, आरोपींना मीनाक्षी शिंदे यांच्या निवासस्थानी शिरताना आणि बाहेर पडताना पाहिल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे हत्येचा कट मीनाक्षी शिंदे यांच्या घरीच रचला गेल्याचा संशय व्यक्त होत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा, हत्येचा कट रचल्याचा गुन्हा आणि संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई करण्याची मागणी केली आहे. मीनाक्षी शिंदे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले असून, आपल्याला राजकीय हेतूने गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, सत्य समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
