एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा
संजय राऊत यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या शांततेच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली, तिला "षंढांची शांतता" असे संबोधले. अमेरिकेने इराणच्या जहाजावर हल्ला केल्याचा आणि पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्याचा उल्लेख करत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. "एपस्टिन फाईल हेच युद्धाचे खरे कारण आहे," असा दावा करत राऊत यांनी जेफ्री एपस्टिन आणि इस्रायल यांच्यातील संबंधांवरही प्रकाश टाकला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शांततेच्या बाजूने असल्याचे म्हटले असले तरी, राऊत यांनी या भूमिकेला षंढांची शांतता असे संबोधले.
राऊत यांच्या मते, युद्ध भारताच्या सीमेवर आले असताना, अमेरिकेने भारताच्या सागरी हद्दीत इराणच्या जहाजावर हल्ला करून १०० हून अधिक नौसैनिकांना मारल्याचा दावा त्यांनी केला. पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्याचा संदर्भ देत, इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या कथित हत्येनंतरही भारताने शोक व्यक्त न केल्याबद्दल त्यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इराण भारताचा पुरातन मित्र असूनही सरकारची ही शांतता षंढांची शांतता असल्याचे राऊत म्हणाले.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एपस्टिन फाईलमुळे हे सर्व आरोप होत असल्याचा संदर्भ देत, राऊत यांनी “एपस्टिन फाईल हेच युद्धाचे मोठे कारण आहे” असा दावा केला. जेफ्री एपस्टिन हा ज्यू आणि इस्रायलशी संबंधित होता, आणि इस्रायलने त्याच्या माध्यमातून जगातील अनेक राजकारण्यांना व उद्योगपतींना जाळ्यात ओढले होते, असेही राऊत यांनी म्हटले. भारताच्या गप्प राहण्यामागे हेच कारण असू शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
