Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी…संजय राऊत थेटच बोलले
संजय राऊत यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि तृणमूल काँग्रेसची तुलना करत, आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी जप्त करायचा असतो असे आक्रमक विधान केले. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर शंभूराज देसाई यांनी आम्ही पक्ष सोडला नाही, तर पक्षांतर्गत वेगळी भूमिका घेतल्याने आमची परिस्थिती वेगळी असल्याचे स्पष्ट केले.
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना यांची तुलना करत राऊत म्हणाले की, “टीएमसी पक्ष मूळ ममता बॅनर्जींचा आहे, तर शिवसेना ठाकरेंची आहे.” त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राऊत यांच्या मते, “आमचं चिन्ह चोरलंय. चोरलेला मुद्देमाल आधी जप्त करायचा असतो.” निवडणूक आयोग कधी चिन्ह गोठवत आहे, कधी फुटकऱ्या गटाला चिन्ह देत आहे, ही हेराफेरी आणि गोलमाल असल्याची टीका त्यांनी केली. लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणूक आयोगाला भविष्यात धडा शिकवावा लागेल, असेही ते म्हणाले.
यावर शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी वेगळी भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही कधीही पक्ष सोडला नाही. पक्षापासून आम्ही बाजूला गेलेलो नाही, फक्त जी भूमिका वेगळी होती, ती दुरुस्त करायचे काम आम्ही २०२२ ला केले.” देसाईंच्या मते, पक्षांतर्गत भूमिका घेत बहुतांशी आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख आणि शिवसैनिकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांची परिस्थिती तृणमूल काँग्रेसपेक्षा वेगळी आहे. निवडणूक आयोगाने सर्व बाजू पाहून पक्ष आणि चिन्ह शिवसेनेकडेच ठेवले, असेही त्यांनी नमूद केले.
