Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत
आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज नाशिक शहरात भक्तिमय वातावरणात दाखल झाली. “हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा” आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात हजारो वारकरी टाळ-मृदुंगाच्या निनादात पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.

त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केल्यानंतर काल पालखीने महिरावणी येथे मुक्काम केला होता. त्यानंतर आज सकाळी पालखीचे नाशिकमध्ये आगमन होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. भगवे ध्वज, पताका आणि विठ्ठलाच्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
नाशिकमध्ये पालखीचे औपचारिक आणि उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी शहराच्या महापौर हिमगौरी आडगे, उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर, साधू-महंत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
स्वागत सोहळ्यादरम्यान जेसीबीच्या साहाय्याने संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या अनोख्या स्वागतामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. वारकऱ्यांनी अभंग, भजन आणि हरिनामाच्या गजरात विठ्ठलभक्तीचा उत्सव साजरा केला.
आता संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पुढील मुक्कामासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली असून, लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने या पवित्र वारीत सहभागी झाले आहेत.