Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी पक्षाच्या प्रवासाचा आढावा घेत विरोधकांवर आणि ठाकरे गटावर जोरदार टीका केली. शिवसेनेचे 60 वर्ष हे केवळ एक आकडेवारी नसून निष्ठा, संस्कार आणि संघर्षाचा वारसा असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी पक्षाच्या प्रवासाचा आढावा घेत विरोधकांवर आणि ठाकरे गटावर जोरदार टीका केली. शिवसेनेचे 60 वर्ष हे केवळ एक आकडेवारी नसून निष्ठा, संस्कार आणि संघर्षाचा वारसा असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणात त्यांनी 1986 मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यापासूनचा अनुभव सांगताना, त्या काळात सत्ता, पैसा किंवा सुविधा नसतानाही मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी कार्यकर्त्यांनी काम केल्याचे नमूद केले. “त्यावेळी मोबाईल, एसी किंवा मोठी साधनं नव्हती. सायकलवरून प्रचार होत होता आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवून संघटना उभी राहिली,” असे ते म्हणाले.
राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी महाविकास आघाडीच्या काळातील नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केली. समविचारी पक्षांपासून दूर जाऊन विरोधी विचारसरणीच्या पक्षांसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे पक्षात नाराजी वाढल्याचा दावा त्यांनी केला.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे टायगर आहेत. कठीण परिस्थितीतही त्यांनी नेतृत्व करत पक्षाला नव्या दिशेने नेले.” गुवाहाटीतील घटनांचाही त्यांनी उल्लेख केला.
दरम्यान, ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीवर बोलताना त्यांनी काही नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. पक्षातील नाराजी वेळेवर दूर करण्यात अपयश आल्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच पक्ष संघटनेत कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांचा उल्लेख करत, शिवसेना शिंदे गट आणखी मजबूत होईल आणि आगामी निवडणुकांमध्ये जनतेचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
