Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क आंदोलनानंतर मोठी कारवाई; आयोजकांवर थेट 3 गुन्हे दाखल!
मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनानंतर आता मोठी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी आंदोलनाच्या आयोजकांविरोधात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी काल छत्रपती शिवाजी पार्क येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मोठ्या संख्येने शिवसैनिक, विद्यार्थी आणि आंदोलनकर्ते उपस्थित होते. सभा संपल्यानंतरही आंदोलकांनी शिवाजी पार्क मैदान रिकामे करण्यास नकार दिल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, या सभेदरम्यान आयोजक, आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, संबंधित सभा आवश्यक परवानगीशिवाय आयोजित करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. पहिला गुन्हा विनापरवानगी आंदोलनाचे आयोजन केल्याप्रकरणी, दुसरा गुन्हा परवानगी नसतानाही नागरिकांना आंदोलनस्थळी जमण्याचे आवाहन केल्याप्रकरणी, तर तिसरा गुन्हा आंदोलनानंतर दादर परिसरात विविध ठिकाणी निदर्शने करून वाहतूक कोंडी निर्माण झाल्याप्रकरणी नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच आदित्य ठाकरे यांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला होता. या कारवाईनंतर शिवाजी पार्क येथील आंदोलन आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले असून, या प्रकरणातील पुढील निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.