Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण… दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
अभिनेता सुनील शेट्टी यांनी ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. ठाणे आपली कर्मभूमी असल्याचे सांगत, त्यांनी शहराच्या उत्सवी वातावरणाचे कौतुक केले. दहीहंडीला एक खेळ मानत, सुरक्षितता आणि महिलांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांनी हजेरी लावली. आमदार रवींद्र पाठक यांच्यासोबत त्यांनी या उत्सवाचा भाग होत ठाणेकरांशी संवाद साधला. यावेळी सुनील शेट्टी यांनी ठाण्याबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले.
शेट्टी म्हणाले की, ठाणे हे त्यांच्यासाठी केवळ एक शहर नसून, त्यांची कर्मभूमी आहे. मुंबईने आणि महाराष्ट्राने त्यांना खूप काही दिले आहे, त्यामुळे मराठी बोलणे हे त्यांचे कर्तव्य आहे. ते वर्षांनुवर्षे केवळ दहीहंडीसाठीच नाही, तर गणपतीसारख्या अन्य सणांसाठीही ठाण्यात येत असतात, असे त्यांनी सांगितले.
दहीहंडीला एक खेळ म्हणून संबोधत, शेट्टी यांनी या खेळातील सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले. रेकॉर्ड ब्रेक करू शकता, पण बोन्स ब्रेक नाही व्हायला पाहिजे, असे म्हणत त्यांनी गोविंदा पथकांना सावध केले. मुंबईत आपण दहीहंडी खेळल्याचे सांगताना, आता वाढत्या वयामुळे भीती वाटते, असेही ते म्हणाले. महिलांच्या दहीहंडी पथकांचे कौतुक करत, महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, त्या प्रत्येक ठिकाणी लीडर आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
