मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक

मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक

| Updated on: Sep 22, 2026 | 9:31 AM

मिरा-भाईंदरमधील तपोवन विद्यालयात एका विद्यार्थ्याला डब्यात मेथीची भाजी आणल्याने ५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. शाळेत जैन समाजाचे बहुसंख्य विद्यार्थी असल्याने मांसाहार किंवा कंदमुळे आणण्यास मनाई असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून, शिक्षण विभागाने शाळेला नोटीस पाठवली आहे. अंबादास दानवेंनीही यावर टीका केली आहे.

मिरा-भाईंदरमधील तपोवन विद्यालयात एका विद्यार्थ्याला डब्यात मेथीची भाजी आणल्याबद्दल ५० रुपयांचा दंड आकारल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेला नोटीस पाठवली आहे. शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी जैन समाजाचे असल्याने मांसाहार आणि कंदमुळे डब्यात न आणण्याच्या सूचना करण्यात आल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) आरोप आहे. मात्र, मेथीची भाजी कंदमूळ नसून पौष्टिक आहार आहे, असे मनसेने म्हटले आहे. या घटनेनंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत शालेय प्रशासनावर टीका केली आहे.

अंबादास दानवे यांनीही या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत, “बरं झालं बिचाऱ्याने पिझ्झा, बर्गर आणला नाही, नाहीतर शाळेने थेट आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन सत्कारच केला असता,” असा टोला लगावला आहे. त्यांनी मिरा-भाईंदरमध्येच अशा घटना का घडत आहेत, असा सवालही उपस्थित केला. विद्यार्थ्यांकडून ५० रुपये दंड वसूल करणे हा दंडनीय अपराध असून गुन्हा असल्याचे मनसेने म्हटले आहे. शिक्षण मंडळाकडे याबाबत तक्रार करण्यात आली असून, शाळा संचालक आणि मुख्याध्यापकांकडून उत्तराची मागणी करण्यात आली आहे.

Published on: Sep 22, 2026 9:31 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us