Uddhav Thackeray | वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप; पाकिस्तानचा दाखला देत घेरलं!
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढत असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आंदोलन करत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सोनम वांगचुक यांच्याशी सरकार चर्चा करत नसल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली.

सध्या सोनम वांगचुक यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू असून, उपचारादरम्यानही त्यांचे आंदोलन सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनीही अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित आंदोलनात उद्धव ठाकरे यांनी वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “पाकिस्तानसोबत चर्चा करण्याची तयारी सरकार दाखवते, पण विद्यार्थ्यांसाठी आणि देशाच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारकडे वेळ नाही.” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी पाकिस्तानसोबत चर्चेचा उल्लेख केल्याचा संदर्भ देत, “जर पाकिस्तानसोबत चर्चा होऊ शकते, तर सोनम वांगचुक यांच्याशी का नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याशिवाय, “जो देश भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करतो त्याच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे, पण देशातील सैनिकांसाठी सोलार टेंट तयार करणाऱ्या व्यक्तीशी सरकार संवाद साधत नाही. मग आंदोलन दडपण्यासाठी एवढा मोठा पोलिस बंदोबस्त कशासाठी?” असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, आपल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारवर हुकूमशाहीचा आरोप करत विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. “देशात बदल घडवायचा असेल तर सर्वांनी एकजूट होऊन लोकशाही वाचवण्यासाठी लढा अधिक तीव्र करावा लागेल,” असे मतही त्यांनी व्यक्त केले.
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होत असून, या मुद्द्यावर आगामी काळात राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.