विखे पाटलांचे मेहुणे विधानसभेसाठी इच्छुक, भाजप आमदाराची डोकेदुखी वाढणार

राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे अहमदनगरमधील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणुकांच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. कोपरगावच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही नुकतीच मुलाखत दिली. त्यामुळे दोघांपैकी कोणाला विधानसभेचं तिकीट मिळणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:43 PM, 5 Sep 2019
विखे पाटलांचे मेहुणे विधानसभेसाठी इच्छुक, भाजप आमदाराची डोकेदुखी वाढणार

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election 2019) शिवसेना-भाजपची युती (Shivsena BJP Alliance) जवळपास निश्चित मानली जात आहे. अहमदनगरमध्ये (Ahmednagar) भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली. मात्र नुकतेच काँग्रेसमधून भाजपच्या गोटात सामील झालेले गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे मेहुणेही नगरमधून विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे कोपरगावच्या (Kopargaon) विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे (Snehlata Kolhe) यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना बुधवारपासून सुरुवात झाली. यावेळी विद्यमान सहा आमदारांनी मुलाखती दिल्या. यात भाजपच्या प्रा. राम शिंदे, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे या विद्यमान आमदारांचा समावेश होता. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे (Rajesh Parjane) हेसुद्धा कोपरगावातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं जातं.

कोपरगाव मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून युतीनंतरही तो भाजपकडेच राहील, असा अंदाज आहे. मात्र परजणे आणि कोल्हे या दोघांनीही कोपरगाव मतदारसंघातूनच निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यास पक्षासाठी ती एक मोठी डोकेदुखी ठरु शकते. राधाकृष्ण विखे पाटील कॅबिनेट मंत्री असल्यामुळे ते मेहुण्याच्या तिकीटाचा आग्रह धरु शकतात. एकाच्या पारड्यात झुकतं माप टाकणं अंतर्गत बंडाळीलाही कारणीभूत ठरु शकतं.

राजेश परजणे हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे यांचे धाकटे बंधू आहेत. राजेश परजणे यांच्याकडे गोदावरी दूध संघाचं अध्यक्षपद आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या तिकीटावर शिंगणापूरमधून ते निवडून आले आहेत. भाजपकडून निवडणूक लढवण्यास ते इच्छुक असले, तरी सत्ताधाऱ्यांकडून तिकीट न मिळाल्यास परजणे अपक्ष निवडणूक लढवू शकतात, असं बोललं जातं. मात्र ही बाबसुद्धा भाजपसाठी चिंतेची ठरु शकते.

विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता पुढील आठवड्यात कधीही लागू शकते. त्याआधीच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील नेते सध्या भाजप किंवा शिवसेनेच्या वळचणीला जात आहेत. मात्र तिकीट न मिळाल्यास भविष्यात सत्ताधारी पक्षातील नाराज उमेदवार इतर पक्षांमध्ये उड्या मारण्याची शक्यता नाकारता येत नाही.