पावसाचा दगा, पेरलेलं बी-बियाणं, खतं वाया गेलं, राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

पेरलेलं बी बियाणं गेलं, खतं वाया गेली… या संकटात पान्हावलेल्या डोळ्यांनी शेतकरी सरकारकडे आस लावून बसला आहे.

पावसाचा दगा, पेरलेलं बी-बियाणं, खतं वाया गेलं, राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
प्रातिनिधिक फोटो

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरुच आहे. गेल्यावर्षी खरीप आणि रब्बीत गेलेली पिकं, कोरोनामुळे पडलेले शेतमालाचे भाव आणि झालेल्या नुकसानीचं ओझं घेऊन यंदा शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली खरी… पण पावसानं पुन्हा दगा दिला. आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय. पेरलेलं बी बियाणं गेलं, खतं वाया गेली… या संकटात पान्हावलेल्या डोळ्यांनी शेतकरी सरकारकडे आस लावून बसला आहे. (Special Report on Crisis of double sowing on Maharashtra farmers)

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

राज्यात मान्सून दाखल झाला. सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आणि बळीराजा पेरणीच्या कामाला लागला. कुणी उसनवारी करुन, तर कुणी कर्ज काढून तर काहींनी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून बियाणं आणलं आणि पेरणीचं सौंग साजरं केले. पण पाऊस गायब झाला आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं. राज्यातील कोकण, औरंगाबाद, पुणे, नागपूर, अमरावती सर्वच महसूल विभागात कुठे ना कुठे दुबार पेरणीचं संकट आहे. त्यामुळे बळीराजा हवालदील झाला आहे.

सरासरी इतकाही पाऊस नाही

राज्यात आतापर्यंत सरासरी 40 टक्क्यांच्या जवळपास खरीप लागवड झाली आहे. यात सर्वाधिक 56 टक्के सोयाबीनची पेरणी झाली आहे, त्यापाठोपाठ 47 टक्क्यांच्या वर कापसाची लागवड झाली आहे. पण बऱ्याच भागात गेल्या 12 ते 15 दिवसांपासून पावसानं दडी मारली आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर काही जिल्ह्यात आणि बऱ्याच तालुक्यात सरासरी इतकाही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे.

राज्यात जून अखेरपर्यंत पडलेल्या पावसाची टक्केवारी

तालुक्याची संख्या  –  पावसाची टक्केवारी

1 तालुका                     0 ते 25 टक्के पाऊस
09 तालुके                   20 ते 50 टक्के पाऊस
25 तालुके                   50 ते 75 टक्के पाऊस
34 तालुके                   75 ते 100 टक्के पाऊस
286 तालुके                100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रूंचा महापूर

राज्यात जून अखेरपर्यंत पडलेल्या पावसाची टक्केवारी पाहता राज्यातील 35 तालुक्यात जून महिन्यात सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यातील नंदुरबार, नाशिक, धुळे, गडचिरोली आणि अकोला जिल्ह्यातील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे.

राज्यात धान, कापूस आणि सोयाबीन ही खरीपातली प्रमुख पिके… मान्सूनच्या सुरुवातीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. राज्यात जून अखेरपर्यंत झालेल्या पेरणीत सोयाबीन आणि धानाचं सर्वाधिक क्षेत्र आहे. पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं. त्यामुळे चिंतातूर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रूंचा महापूर आला आहे

(Special Report on Crisis of double sowing on Maharashtra farmers)

संबंधित बातम्या : 

अकोल्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, पावसाअभावी 70 टक्के पेरण्या खोळंबल्या

Weather Report : राज्यातील 6 जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट, पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचं संकट

हमी भावाने गहु खरेदीचा नवा विक्रम, शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 84,369 कोटी रुपये जमा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI