Gold Price : सोने एकदम सूसाट, रेकॉर्डवर रेकॉर्ड! काय भाव असेल पुढील आठवड्यात

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 18, 2023 | 7:58 PM

Gold Price : सोन्याला पुन्हा झळाळी आली. सोन्याने जोरदार मुसंडी मारली. सोन्याने आज संध्याकाळपर्यंत मोठा पल्ला गाठला. सकाळच्या किंमतींपेक्षा संध्याकाळी सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडले.

Gold Price : सोने एकदम सूसाट, रेकॉर्डवर रेकॉर्ड! काय भाव असेल पुढील आठवड्यात
Record वर रेकॉर्ड

नवी दिल्ली : सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची सध्या चांदी झाली आहे. सोन्या-चांदीतील (Gold-Silver Price) गुंतवणूक सर्वसामान्य जनतेसाठी फायदेशीर ठरली आहे. ज्यांनी यापूर्वी सोन्यात गुंतवणूक केली होती. त्यांना या नवीन भावाने शंभर हत्तींचे बळ मिळाले आहे. सोन्याने सकाळी 2 फेब्रुवारी रोजीच्या विक्रमाला गवसणी घातली होती. दीड महिन्यापूर्वी एक तोळा सोन्यासाठी 58,880 रुपये भाव होता. त्यानंतर सोन्याने माघार घेतली होती. पण या आठवड्यात गुरुवार वगळता किंमतींनी रोज नवीन भरारी घेतली. आज संध्याकाळी तर सोन्याने पुन्हा नवीन विक्रम (Record) केला. 24 कॅरेट एक तोळा सोन्याने 60,470 रुपयांचा दर गाठला. गुडरिटर्न्सने हे दर जाहीर केले आहेत. सकाळी मात्र जवळपास एक हजाराने हा भाव कमी होता.

भावात सातत्याने भरारी घेतल्याने पिवळ्या धातूने अनेकांना घाम फोडला आहे. या आठवड्यातच सोन्याने साठ हजारी मनसबदारीवर दावा ठोकल्याने आता पुढे किती भाव वाढतील हा असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील आठवड्यात सोने 62000 हजारांचा टप्पा गाठूनच परत फिरेल. त्यांच्या मते, अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी सोन्याच्या पथ्यावर पडत आहे. सोनेच नाही तर चांदीच्या किंमती पण कमाल करतील, असा तज्ज्ञांचा दावा आहे. गुंतवणुकीसाठी सोने हा सुरक्षित पर्याय मानण्यात येतो.

एमसीएक्सवर शुक्रवारी सोन्याचा भाव दिवसभराच्या व्यापारी सत्रात 59,461 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. हा त्याचा उच्चांकी भाव होता. संध्याकाळी सोन्याच्या किंमतीत बदल झाला. हा भाव 59,420 रुपये प्रति तोळ्यावर आल्या. गुरुवारच्या तुलनेत एप्रिलसाठी सोन्याची फ्युचर प्राईस 1,414 रुपयांच्या तेजीने बंद झाली.

हे सुद्धा वाचा

सोन्या-चांदीच्या बाजारात तेजीचे सत्र सुरु आहे. अमेरिका आणि युरोपच्या बँकिंग क्षेत्रातील पडझड आणि मंदीची शंका यामुळे हे तेजीचे सत्र आले आहे. या घडामोडींनी जगभरातील शेअर बाजारांना तडाखा बसला आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार सोन्यात पैसा ओततत आहेत. आज तर सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे.

यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी सोने 58,880 रुपयांवर पोहचले होते. हा त्याचा उच्चांकी भाव होता. पण त्यानंतर भावात घसरण सुरु झाली. गेल्या आठवड्यापर्यंत ही घसरण सुरु होती. सोने तब्बल 3000 रुपयांनी घसरले होते. एक वेळ तर सोन्याचा भाव 53,000 रुपयांच्या खाली उतरले होते.

सोन्यातून जोरदार परतावा

सोन्याने या वर्षीच्या सुरुवातीपासून अनेकांना मालामाल केले आहे. ज्यांनी वर्षाच्या सुरुवातीला सोन्यात गुंतवणूक केली. त्यांना जवळपास 4,366 रुपये म्हणजे 8 टक्क्यांचा फायदा झाला. त्यांना जोरदार परतावा मिळाला. तर ज्यांनी गेल्या वर्षी दिवाळीमध्ये सोन्याचा भाव 50,000 रुपयांचा घरात होता, त्यावेळी गुंतवणूक केली. त्यांना तर तब्बल 10 हजार रुपये प्रति तोळा फायदा झाला आहे. चांदीने पण अनेकांची चांदी केली आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI