या सँडलची किंमत 83,000 रुपये, Prada आणणार बाजारात, जाणून घ्या काय खास
Kolhapuri Chappal: प्रसिद्ध लग्झरी फॅशन ब्रँड प्राडाने (Prada) एक करार केला आहे. त्याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. हा ब्रँड आता ही खास चप्पल, सँडल 83,000 रुपयांना विक्री करणार आहे. यापूर्वी ही कंपनी याच चप्पलमुळे वादात सापडली होती.

Kolhapuri Sandals: कोल्हापुरी चप्पल महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरात लोकप्रिय आहे. कोल्हापुरी चप्पलचा हटके अंदाजामुळे ती खास कार्यक्रमात पायात घातली जाते. कोल्हापुरी चप्पल आता परदेशातही लोकप्रिय ठरली आहे. इटलीपर्यंत तिची मागणी वाढली. ही चप्पल कोल्हापुरात 500 रुपये ते पुढे 1500 रुपयांपर्यंत मिळते. पण इटलीत या चप्पलची किंमत 83,000 रुपये आहे. इटलीचा लग्झरी फॅशन ब्रँड प्राडाने (Prada) स्थानिक भारतीय कारागिरांसोबत खास करार केला आहे. त्यांनी एक लिमिटेड एडिशन सँडल कलेक्शन बाजारात उतरवण्याचे ठरवले आहे. प्राडा आता कोल्हापुरी चप्पल भारतातून खरेदी करेल. प्राडा फेब्रुवारी 2026 मध्ये कोल्हापुरी चप्पल लाँच करेल.
कोल्हापुरी चप्पल खरेदी करा ऑनलाईन
कोल्हापुरी चप्पल ही प्राडाच्या जवळपास 40 हून अधिका प्राडा स्टोअर्स आणि ऑनलाईन उपलब्ध असेल. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, प्राडाने दोन सरकारी संस्थांशी करार करून महाराष्ट्र आणि कर्नाटकातून 2,000 जोडी सँडल तयार करुन त्याची विक्री करणार आहे. महाराष्ट्रातील लिडकॉम आणि कर्नाटकातील लिडकार सरकारी संस्थांचा यामध्ये समावेश आहे. प्राडा, लिडकॉम आणि लिडकार संस्थेसाठी खास प्रशिक्षण पण देणारा आहे. त्यामुळे पारंपारिकतेला आधुनिकतेचा साज चढणार आहे .
प्राडाने ओढावून घेतला होता वाद
सहा महिन्यांपूर्वी प्राडाने एका फॅशन शोमध्ये अगदी कोल्हापुरी चप्पलसारखी सँडल वापरली होती. त्याची छायाचित्रं इंटरनेटवर व्हायरल झाली. भारतीय लोकांनी त्यावर प्राडाला चांगलंच सुनावलं. त्यानंतर प्राडाने सँडलचे हे डिझाईन पूर्णपणे भारतीय शैलीतूनच घेतल्याचे मान्य केले. आता कंपनीने महाराष्ट्राची LIDCOM आणि कर्नाटकची LIDKAR या दोन सरकारी संस्थांशी करार केला आहे. त्यामुळे या पारंपारिक व्यवसायाला नवीन उभारी आणि जागतिक मंच मिळणार आहे. कोल्हापुरी चप्पल ही अत्यंत जुनं पादत्राण असून राजा-महाराजांसाठी इथं कमावलेल्या कातड्यापासून या चप्पल तयार होत होत्या. 12 व्या शतकापूर्वीही त्याचा उल्लेख आढळल्याचे सांगण्यात येते. तेव्हापासून कोल्हापूरात या चप्पलांचा व्यवसाय सुरू आहे. आता त्यात तंत्रज्ञानाचाही प्रवेश झाला आहे. या चप्पलांना पुर्वीपासूनच देशात मागणी आहे. आता त्याला आधुनिकतेचा साज चढणार आहे.
