बँकेत नोकरी करायची आहे? मग EXIM बँक देत आहे सुवर्णसंधी!
बँकिंग क्षेत्रात करिअर करायचंय? मग EXIM Bank मध्ये नोकरीची ही सुवर्णसंधी गमावू नका. अर्जाची शेवटची तारीख 15 एप्रिल आहे, त्यामुळे आजच वेबसाइटवर जाऊन तुमचा अर्ज भरून टाका!

जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचं स्वप्न पाहत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी खास आहे. इंडिया एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक (EXIM Bank) ने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, त्यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी, डिप्टी मॅनेजर आणि चीफ मॅनेजर या पदांचा समावेश आहे. ही भरती थेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून केली जाणार आहे, त्यामुळे कोणत्याही एजंटकडे जाण्याची गरज नाही.
EXIM बँकेची माहिती
EXIM बँक (Export-Import Bank of India) ही भारत सरकारच्या मालकीची वित्तीय संस्था आहे, जी 1982 साली स्थापन झाली. या बँकेचा उद्देश भारताच्या निर्यात व आयात व्यवहारांना चालना देणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात भारतीय कंपन्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. एक्सिम बँक निर्यात वित्तपुरवठा, परदेशी प्रकल्पांसाठी कर्ज, सल्लागार सेवा आणि विमा सुविधा देते. मुंबई हे तिचं मुख्यालय असून देशभरात आणि परदेशातही तिची कार्यालयं आहेत. ही बँक भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणात महत्त्वाची भूमिका बजावते आणि उद्योजकांना जागतिक बाजारात पोहोचण्यास मदत करते.
कोणत्या पदांसाठी संधी?
या भरती मोहिमेंतर्गत एकूण 28 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यात मॅनेजमेंट ट्रेनीसाठी सर्वाधिक 22 जागा आहेत. त्याशिवाय डिप्टी मॅनेजरच्या 5 आणि चीफ मॅनेजरसाठी 1 जागा आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 22 मार्च 2025 पासून सुरू झाली असून, 15 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. लक्षात ठेवा, शेवटच्या दिवशी सर्व्हर स्लो असतो किंवा तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अर्ज लवकर पूर्ण करणे फायदेशीर ठरेल.
अर्ज प्रक्रिया कशी करायची?
सर्वप्रथम EXIM बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://www.eximbankindia.in/careers
संबंधित पदाच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचं नाव, मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी इत्यादी तपशील भरून रजिस्ट्रेशन करा.
रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉगिन करा.
आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट घ्या आणि सुरक्षित ठेवा.
अर्ज शुल्क किती?
सामान्य व ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी – ₹600
SC, ST, PwBD, EWS आणि महिला उमेदवारांसाठी – ₹100
परीक्षा कधी होणार?
EXIM बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, मे 2025 मध्ये लिखित परीक्षा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता वेळ वाया न घालवता अभ्यास सुरू करा. योग्य वेळेवर अर्ज केल्यास अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल.
ही संधी का महत्त्वाची?
EXIM Bank ही भारत सरकारची महत्वाची आर्थिक संस्था आहे. येथे नोकरी मिळवणं म्हणजे फक्त चांगला पगार आणि स्थैर्य नाही, तर एक प्रतिष्ठित करिअरसुद्धा आहे. त्यामुळे या सुवर्णसंधीचा लाभ घ्या.