आधी पत्नी, मुलांना मारलं, मग स्वत:लाही संपवलं, पण त्याने असं का केलं ?
वैयक्तिक कारणांमुळे हा गुन्हा घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच एकच गदारोळ माजला. मृत इसमाच्या घरातून पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली असून त्यातून कारणांचा उलगडा होऊ शकतो.

कडप्पा | 5 ऑक्टोबर 2023 : आंध्र प्रदेशमध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना (crime news) घडल्याचे समोर आले. 55 वर्षीय हेड कॉन्स्टेबलने कुटुंबातील तीन सदस्यांची हत्या करून स्वत:चंही आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. वैयक्तिक कारणांमुळे घडलेला हा प्रकार गुरूवारी सकाळी उघडकीस आला. तसेच मृत इसमाच्या घरातून एक सुसाईड नोटही मिळाली असून त्याद्वारे अनेक कारणांचा उलगडा होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
वेंकटेश्वरलू असे मृत इसमाचे नाव असून ते कडपा टू टाऊन पोलिस स्टेशनमध्ये लेखनिक म्हणून कार्यरत होते.ते कडप्पा शहरातील एनजीओ कॉलनीत राहत होते. बुधवारी रात्री त्यांनी पोलिस स्टेशनमधून एक पिस्तूल आणि काही गोळ्या घेतल्या आणि त्यानंतर ते घरी गेले, असे कडपा पोलिस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याने प्रथम त्याची पत्नी आणि दोन मुलींची हत्या केली. आणि त्यानंतर स्वत:लाही संपवले. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी. गुरूवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यापासून संपूर्ण शहर हादरलं आहे.
सुसाईड नोटमधून होणार उलगडा ?
वेंकटेश्वरलू यांची मोठी मुलगी सुमारे २० वर्षांची होती आणि ती ग्रॅज्युएशनचा पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होती. तर छोटी लेक ही १० वीमध्ये शिकत होत असे समजते. त्यांच्या पत्नीचे वय सुमारे ४५ वर्षं होते, अशी माहिती मिळाली आहे. प्राथमिक तपासात सर्व काही स्पष्ट होईल. आत्महत्या करण्यापूर्वी व्यंकटेश्वरलू यांनी सुसाईड नोट लिहिली होती, त्यातूनही अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले.
स्टॉक मार्केटमध्ये पैसे गमावल्याने ते टेन्शनमध्ये होते, आणि म्हणूनच हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज काहींनी व्यक्त केला. तर कुटुंबातील वैयक्तिक प्रॉब्लेम्सना कंटाळून त्यांनी आयुष्य संपवलं असावं असा तर्क इतर व्यक्त करत आहेत. मात्र कारण काहीही असले तरी त्यांनी एवढं मोठं आणि टोकाचं पाऊल उचलणं योग्य नव्हतं, कुटुंब असं उद्ध्वस्त करायला नको होतं अशी हळहळ शेजारी-पाजारी आणि ओळखीचे लोक व्यक्त करत आहे.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सिद्धार्थ कौशल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कारणांचा शोध घेत आहेत.
