या महिलेच्या प्लॅन पुढे सर्व फेल, बॉयफ्रेंडने लग्न केल्याचा राग, तिने त्याच्या पत्नीचा असा घेतला बदला की पोलिसांनी डोक्याला लावला हात
बॉयफ्रेंडचं लग्न झाल्याचा राग. महिलेने बदला घेण्यासाठी असा रचला प्लॅन की तपासानंतर पोलिस देखील चक्रावले. प्लॅन ऐकून तुमची देखील पायाखलची जमीन सरकेल.

Crime News : देशभरात सध्या प्रेमासाठी कोण काय करेल याचा विचार न केलेलाच बरा असं म्हटलं तर आता ते वावग ठरणार नाही. कारण सध्या अशी एक बातमी समोर आली आहे जी ऐकून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली असून, प्रेमातून निर्माण झालेल्या रागातून एका महिलेने आपल्या माजी प्रियकराच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बी. बोया वसुंधरा वय 34 ही या कटाची मुख्य सूत्रधार असून तिच्यासोबत नर्स कोंगे ज्योती आणि तिची दोन मुले या गुन्ह्यात सहभागी होती. वसुंधराला आपल्या माजी प्रियकराचे लग्न झालेले सहन झाले नाही. त्याच रागातून तिने प्रियकराच्या पत्नीला इजा पोहोचवण्याचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.
अपघाताचा बनाव करून हल्ला
दरम्यान, 9 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास पीडित महिला आपल्या लंच ब्रेकमध्ये स्कूटरवरून घरी जात होती. ती कर्नूल येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. याच दरम्यान आरोपींनी दुचाकीने स्कूटरला धडक देत अपघात घडवून आणला, ज्यात पीडिता जखमी झाली.
अपघातानंतर वसुंधरा मदत करण्याचा बनाव करत पीडितेजवळ गेली. पोलिसांच्या माहितीनुसार, तिने आधीच तयार करून आणलेली HIV संक्रमित रक्ताची सुई पीडित महिलेला टोचली. हा प्रकार अत्यंत अमानवी आणि गंभीर स्वरूपाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सरकारी रुग्णालयातून मिळवले संक्रमित रक्त
पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान असे समोर आले की, आरोपींनी सरकारी रुग्णालयातून संशोधनाच्या नावाखाली HIV रुग्णांचे रक्तनमुने मिळवले होते. हल्ला केल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
पीडितेच्या पतीने, जो स्वतः डॉक्टर आहे त्याने 10 जानेवारी रोजी कर्नूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत चारही आरोपींना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 126(2), 118(1), 272 तसेच 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून या संपूर्ण कटामागील इतर संभाव्य बाबींचा तपास पोलीस करत आहेत.
