Nashik| भाजप मंडल अध्यक्ष खुनातील संशयित बर्वेला 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, इतर संशयितांचा तपास सुरू

गेल्या आठवड्यात सलग तीन खून झाल्याने नाशिक जिल्हा हादरून गेला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची बदली करा, अशी मागणी भाजप नेत्यांनी उचलून धरली आहे.

Nashik| भाजप मंडल अध्यक्ष खुनातील संशयित बर्वेला 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, इतर संशयितांचा तपास सुरू
संग्रहित छायाचित्र.

नाशिकः अवघे नाशिक हादरवून टाकणाऱ्या भाजप (BJP) मंडल अध्यक्ष अमोल इघे यांच्या खुनातील (Amol Ighe Murder) आरोपी विनोद उर्फ विनायक बाळासाहेब बर्वे (वय 38, श्रमिकनगर) या जिल्हा व सत्र न्यायालयाने 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बर्वेसोबत आणखी कोणी संशयित आहेत का, याचाही पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन खून झाल्याने नाशिक जिल्हा हादरून गेला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची बदली करा, अशी मागणी भाजप नेत्यांनी उचलून धरली आहे. सातपूर पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी करत यापूर्वीही त्यांनी ही मागणी केली होती.

काय आहे प्रकरण?

नाशिकमधील सातपूरचे भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या करण्यात आली. शुक्रवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अमोल इघे यांना फोन केला. त्यांना घराबाहेर बोलावून धारदार शस्त्राने वार करत इघेंची निर्घृण हत्या केली. नाशिकमधील कार्बन नाका परिसरात ही घटना घडली. या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून पहाटे सहा वाजता नेमके काय घडले, याचा शोध पोलीस घेत आहेत.

बर्वेवर अनेक गुन्हे

इघे खुनातील आरोपी बर्वेला पोलिसांनी परजिल्ह्यात जावून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल झाल्याचे समोर आले आहे. सोबतच त्याच्यावर एक प्राणघातक हल्ल्याचा गुन्हाही दाखल आहे. त्याने एकट्याने खून केला की, त्याच्यासोबत आणखी कोणी होते, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

राष्ट्रवादीचा पदाधिकारी

राजकीय युनियनच्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. संशयित आरोपी हा राष्ट्रवादीच्या कामगार वंचित आघाडीचा पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे. त्याने महिन्याभरापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. नाशिकचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाल्याचीही माहिती आहे.

भाजप विरुद्ध राष्ट्रवादी

नाशिकमध्ये फेब्रुवारीत महापालिका निवडणूक आहे. त्या तोंडावर आता शहरात या खून प्रकरणामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र तयार झाले आहे. भाजपचे नेते माधव भंडारी यांनी कालच नाशिकमध्ये हजेरी लावली. त्यांनी आपल्या भाषणात तसे सूचक वक्तव्यही केले. दरम्यान, अमोल इघे यांना सर्वपक्षीयांनीही श्रद्धांजली वाहिली. या श्रद्धांजली सभेत राष्ट्रवादीचे पदाधिकारीही सहभागी झाले. मात्र, तरीही दोन्ही पक्षात धुसफूस पाहायला मिळते आहे.

इतर बातम्याः

पेट्रोल पंपावरील तैनात फौजफाटा वापस बोलावला; नाशिकमधील हेल्मेटसक्तीवर 8 दिवसांत होणार सुनावणी

साहित्य संमेलनात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील 50 ग्रंथाचे प्रकाशन; 26 ग्रंथ मराठी, 14 ग्रंथ इंग्रजी आणि 10 ग्रंथ हिंदी भाषेत

Published On - 10:34 am, Sun, 28 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI