पुण्यात अंगावर तेल उडून विवाहिता जखमी, उपचारासाठी नंदुरबारला नेण्याचा शिक्षक नवऱ्याचा हट्ट, वाटेतच मृत्यू

पुण्यातील मोठमोठी रुग्णालयं सोडून पती आशिष याने निशाला उपचारासाठी आदिवासी जिल्हा असलेल्या नंदुरबारला नेण्याचे ठरवले. नवापूर येथील चिंचपाडा येथे खाजगी वाहनाने घेऊन जात असताना नाशिक जिल्ह्यातील येवल्याजवळ निशाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले.

पुण्यात अंगावर तेल उडून विवाहिता जखमी, उपचारासाठी नंदुरबारला नेण्याचा शिक्षक नवऱ्याचा हट्ट, वाटेतच मृत्यू
येवला उपजिल्हा रुग्णालय

नाशिक : अंगावर तेल पडून भाजलेल्या विवाहितेचा उपचारापूर्वीच रस्त्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुणे येथून नंदुरबारला उपचारासाठी खाजगी वाहनाने नेत असताना येवला परिसरात ही घटना घडली आहे. शिक्षक नवऱ्याचा बायकोला नंदुरबारला उपचारांसाठी नेण्याचा अट्टाहास अंगलट आल्याचं चित्र आहे.

तेल उडून विवाहिता भाजली

नंदुरबार येथील आशिष वळवी हे पुण्यात शिक्षक आहेत. नोकरीनिमित्त सध्या ते पुणे जिल्ह्यातील हवेली येथील नारायण नगर भागात आपली पत्नी निशा आशिष वळवी आणि मुलांसोबत राहतात. काल (गुरुवारी) संध्याकाळी निशा स्वयंपाक करत असताना अंगावर तेल पडल्याने अचानक लागलेल्या आगीत निशा भाजली होती.

नंदुरबारला नेताना वाटेत मृत्यू

पुण्यातील मोठमोठी रुग्णालयं सोडून पती आशिष याने निशाला उपचारासाठी आदिवासी जिल्हा असलेल्या नंदुरबारला नेण्याचे ठरवले. नवापूर येथील चिंचपाडा येथे खाजगी वाहनाने घेऊन जात असताना नाशिक जिल्ह्यातील येवल्याजवळ निशाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी वाहन चालक त्यांना येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सोडून निघून गेला.

अकस्मात मृत्यूची नोंद

यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता निशा हिला मयत घोषित करण्यात आले. येवला शहर पोलिसांना मयत महिलेबाबत माहिती दिली असता या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी पुणे जिल्ह्यातील हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात येणार आहे.

बीएमसीच्या माजी आयुक्तांचा होरपळून मृत्यू

दरम्यान, मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के. नलिनाक्षन यांचाही जुलै महिन्यात भाजून मृत्यू झाला होता. घरात पूजा करताना कपडे पेटल्यामुळे नलिनाक्षन गंभीररित्या भाजले होते. मात्र भायखळ्याच्या मसीना रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 79 वर्षांचे होते.  के. नलिनाक्षन सकाळी राहत्या घरी पूजा करत होते, त्यावेळी त्यांच्या लुंगीने पेट घेतला. यामध्ये ते 80 ते 90 टक्के भाजले होते. त्यांना तातडीने मसीना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु शुक्रवारी उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पट्ट्यामुळे लुंगी सोडवणं कठीण

चर्चगेटमधील ‘ए’ मार्गावरील शार्लीविले इमारतीत कुटुंबासोबत राहत होते. जळत्या कापरामुळे त्यांच्या लुंगीने पेट घेतला. पत्नी आणि मोलकरीण त्यावेळी घरी होत्या, मात्र त्यांची खोली आतून बंद असल्यामुळे त्यांना काही करता आलं नाही. देवपूजेच्या खोलीचे दार तोडून आत जाईपर्यंत बराच वेळ गेला होता. त्यांनी पट्टाही लावलेला असल्याने लुंगी सोडवणं शक्य होत नव्हतं. त्यांना आम्ही तातडीने मसीना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. परंतु त्यांची प्रकृती ढासळत गेली होती.

संबंधित बातम्या :

घरात पूजा करताना कपड्यांना पेट, मुंबई महापालिकेच्या माजी आयुक्तांचा होरपळून मृत्यू

लग्नात जेवणाच्या गरम कढईत आचारी पडला, 25 वर्षीय तरुणाचा भाजून मृत्यू

प्रियकराने पेट्रोल ओतून पेटवलं, प्रेयसीने मिठी मारली, मुंबईत तरुणाचा होरपळून मृत्यू

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI