बेड्या पडताच लग्नाची बेडी तुटली, इंद्राणी-पीटर मुखर्जीचा घटस्फोट

पीटर-इंद्राणी 17 वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले होते. गेल्या वर्षी त्यांनी वांद्र्यातील कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:31 AM, 4 Oct 2019
बेड्या पडताच लग्नाची बेडी तुटली, इंद्राणी-पीटर मुखर्जीचा घटस्फोट

मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांना अखेर घटस्फोट (Peter and Indrani Mukerjea Divorce) मंजूर झाला आहे. परस्पर संमतीने दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या चार वर्षांपासून मुखर्जी दाम्पत्य हत्येप्रकरणी गजाआड आहे.

पीटर-इंद्राणी 17 वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले होते. गेल्या वर्षी त्यांनी वांद्र्यातील कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. शीना बोरा हत्याकांड प्रकरणात हे दोघंही तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेला वेळ लागणार होता.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात इंद्राणीने पीटरला घटस्फोटाची नोटीस (Peter and Indrani Mukerjea Divorce) पाठवली होती. इंद्राणीला सहमतीने घटस्फोट देण्यास आपण राजी असल्याचं पीटरने गेल्या जून महिन्यात कळवलं होतं. ‘आपल्या दोघांमधील पती-पत्नीचं नातं पुन्हा जुळण्यापलिकडे गेलं आहे’ असं या नोटीसमध्ये इंद्राणीने म्हटलं होतं. पीटरनेही या नोटीसला होकार देत रजिस्टर पोस्टाने उत्तर पाठवलं.

घटस्फोट घेताना मालमत्तेची दोघांमध्ये समसमान वाटणी केली जाईल, असं त्या दोघांनी म्हटलं होतं. बँकेत असलेले पैसे, पेंटिंगसह घरातील इतर वस्तूही अर्ध्या-अर्ध्या वाटण्यावर सहमती झाली होती.

एप्रिल 2012 मध्ये इंद्राणीने तिची मुलगी शीना बोरा हिची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. मात्र हे प्रकरण उघडकीस येईपर्यंत तीन वर्षांचा कालावधी गेला. 2015 मध्ये या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर एक-एक करत मोहरे समोर येत गेले.

पत्नीला मांडीत बसवून अभिनेत्याचं ड्रायव्हिंग, सहा जणांना उडवलं, दोघांचा मृत्यू

पीटर, इंद्राणी आणि इंद्राणीचा पार्टनर संजीव खन्ना यांच्यावर शीना बोरा हत्याकांडाचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआय कोर्टात खटला सुरु आहे. पीटर मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात, तर इंद्राणी भायखळ्याच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

पीटर मुखर्जीचं आधी लग्न झालेलं होतं. त्याला दोन मुलंही आहेत. तर इंद्राणीला पहिल्या पतीपासून शीना आणि मिखाईल ही दोन मुलं आहेत. इंद्राणी-पीटरने नोव्हेंबर 2002 मध्ये लग्न केलं होतं. इंद्राणीने आपल्याला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप तिचा दुसरा मुलगा मिखाईलने केला होता.

शीनाचा पहिला पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामराय या दोघांनी पनवेल जवळच्या जंगलात शीनाच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि जाळले. तर अर्धवट जळलेले तुकडे पुरले होते. ड्रायव्हर श्यामरायला बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला.