Pune Crime : रात्रीची वेळ, रस्त्यावर भरधाव गाड्या आणि हातात कोयता घेऊन सपकन वार… कोयता गँगच्या धूमाकूळामुळे पुणं हादरलं
ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली. रात्रीच्या वेळेस भररस्त्यात तरुणांच्या एका गटात भररस्त्यात तुफान हाणामारी सुरू असल्याचे त्यात दिसले. यामुळे मोठी दहशत माजली आहे.

पुण्यातील गुन्ह्यांचे आणि पर्यायाने दहशतीचे वातावरण वाढतच असून विद्येचे माहेरघर असलेले हे शहर आता एक नवी, क्रूर ओळखं मिळवतंय की काय अशा घटना एकापाठोपाठ एक घडतच आहेत. कधी स्वारगेट बस अत्याचार, तर कधी ड्रिंक अँड ड्राईव्ह करत निष्पापांना उडवणं असो किंवा तरूणांची नशेत अश्लील कृत्य असोत. पुण्याचं नाव दिवसेंदिवस बदनाम होत चाललंय. हेच कमी की काय म्हणू भरदिवसा हल्ले, मारमारी, खूनही होत आहेतच. गेल्या कित्येक दिवसांपासून पुण्यात कोयता गँगनेही धूमाकूळ घातला असून त्याचाच एक ताजा व्हिडीओही समोर आला.
रात्रीच्या वेळी, भररस्त्यात वेगाने, वाहनांची वर्दळ सुरू असतानाच, काही तरूणांचा एकमेकांशी वाद झाला, राडा झाला आणि त्यातील काही लोकांनी एकमेकांवर कोयत्याने सपासव वार करत जीवघेणा हल्लाच केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करून ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केलेत. पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे, गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावे,अशी विनंतही त्यांनी केली आहे.
भररस्त्यात तरूणांचे एकमेकांवर कोयत्याने वार, सीसीटीव्हीत भयानक प्रकार कैद
पुण्यातील बिबेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतच हातात कोयता घेऊन तरुणांच्या एका गटाने तूफान हाणामारी केली. भरधाव वेगाने गाड्या आजूबाजूला जात असतानाही त्याची पर्वा न करता रस्त्यात उभे राहून, तरूणांच्या गटाने एकमेकांवर धावून जात कोयत्याने सपासप वार केले. हा भयानक हल्ला तेथील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैदही झाला. दरम्यान याप्रकरणी पुणे पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे हल्ला करणारे तरूण म्हणजे कुख्यात गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे..
पोलिसांनी दिलेल्यच्या माहितीनुसार, सुरज भिसे, सुमित भिसे, आदित्य पवार आणि सतीश पवार या चार तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ते पुण्यातील सराईत गु्न्हेगार आहेत. यांनी यापूर्वीही अशाप्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या गुन्हेगारीचा रेकॉर्ड पाहून पोलिसांनी विशेष तपास सुरु केला, असेही सांगण्यात आले.
ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली. रात्रीच्या वेळेस भररस्त्यात तरुणांच्या एका गटात भररस्त्यात तुफान हाणामारी सुरू असल्याचे त्यात दिसले. तेवढ्यात एका तरूणाने शेजारीच उभ्या असलेल्या दुशऱ्या तरूणावर त्वेषाने कोयता उगारला. ते पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या इतर नागरिकांची मात्र भीतीने बोबडी वळाली. एक महिला तर बाईकवरून उतरून भीतीने मागेच पळाली.
त्यानंतरही गुन्हेगारांचा हैदोस सुरूच होता. तेवढ्यात तिथे इतर काही तरूण आले आणि मारामारी सुरू झाली. फुल शर्ट आणि काळी फुल पँट घातलेल्या एका इसमाला इतरांनी रस्त्यावर ढकललं, तो खाली पडला आणि इतर तरूणांपैकी दोघांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले, ते त्याला मारतच राहिले. तर काळा शर्ट घातलेला दुसरा एक इसम हातात जड वस्तू घेऊन आला आणि समोरच्या गटातील दुसऱ्या तरूणाच्या डोक्यात हाणण्याचा प्रयत्न केला. समोरील गटातील तरूणांनीही वीट उचलून त्यांच्यावर फेकण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ त्यांची मारामारी सुरूच होती. या प्रकारामुळे प्रचंड दशहत माजली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
रोहित पवारांनी केलं ट्विट
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही हा व्हिडीओ ट्विट करत कोयता गँगबद्दल प्रश्न उपस्थित केला. ” पुण्यातल्या कोयता गँग चा बंदोबस्त करण्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता सरकारने कोयता गँग अस्तित्वात नसल्याचे सांगितले होते….आणि हा बघा कोयता गँग चा कालचा थरार! पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे, गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावे, ही विनंती! ” असे त्यांनी ट्विटमध्ये लिहीले.
पुण्यातल्या कोयता गँग चा बंदोबस्त करण्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता सरकारने कोयता गँग अस्तित्वात नसल्याचे सांगितले होते….आणि हा बघा कोयता गँग चा कालचा थरार! पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे, गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावे, ही विनंती!… pic.twitter.com/dMZnjFL2IK
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 3, 2025
