…नाहीतर ईडी-सीबीआय चौकशी करायला लावू, मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअपवर धमकी

मिलिंद नार्वेकर यांच्याकडे आरोपींनी नेमकी कोणती मागणी केली, याचे तपशील अद्याप उघड झालेले नाहीत. मात्र ईडी, एनआयए आणि सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा मागे लावण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे.

...नाहीतर ईडी-सीबीआय चौकशी करायला लावू, मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअपवर धमकी
Milind Narvekar

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर धमकी मिळाल्याचा आरोप होत आहे. आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू, अशी अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याची माहिती आहे. मिलिंद नार्वेकर यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.

मिलिंद नार्वेकर यांच्याकडे आरोपींनी नेमकी कोणती मागणी केली, याचे तपशील अद्याप उघड झालेले नाहीत. मात्र ईडी, एनआयए आणि सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा मागे लावण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे. याबाबत मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे नार्वेकरांनी तक्रार दाखल केली असून त्याबाबत काय पावलं उचलली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

मिलिंद नार्वेकरांचा अल्पपरिचय

मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली.

मिलिंद नार्वेकर काही वर्षांपूर्वी मातोश्रीवर शाखाप्रमुख पदाच्या मुलाखतीसाठी गेले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांची नजर मिलिंद नार्वेकरांवर गेली. मिलिंद नार्वेकर यांच्यातील हुशारी, संवाद कौशल्य या गुणांमुळे मिलिंद नार्वेकरांची उद्धव ठाकरेंच्या पीए म्हणून निवड झाली. तेव्हापासून ते आजतायागत नार्वेकर हे अनेक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडत आहेत.

मुरुडच्या बंगल्यावरुन नार्वेकरांवर किरीट सोमय्यांचा आरोप

दरम्यान, मिलिंद नार्वेकर यांनी कोणतीही परवानगी न घेता कोकणात दापोलीमध्ये समुद्र किनारी बंगला बांधला, असा आरोप भाजपचे दिग्गज नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डावा हात असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीत मुरुड गावाच्या समुद्र किनाऱ्यावर 72 गुंठा जागा घेतली, त्यात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गैरकायदेशीररित्या भव्य दुमजली बंगल्याचे काम जोरात सुरु केले आहे. मोठ्या प्रमाणात जंगलाची, झाडांची नासधूस सुरु आहे. तसेच मोठं उत्खननही चाललं आहे.” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

संबंधित बातम्या :

दापोलीच्या समुद्र किनारी परवानगी न घेता मिलिंद नार्वेकरांचा बंगला, किरीट सोमय्यांचा आरोप

BCCI चे MCA च्या पावलावर पाऊल, मिलिंद नार्वेकरांकडून IPL स्थगितीचे स्वागत

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI