बीडमध्ये गुन्हेगारी कमी होईना, आष्टीत 2 भावांची निर्घृण हत्या, अंबाजोगाईत गोळीबार
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाहिरा गावात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या झाली. आपापसातील वादामुळे ही घटना घडली. पोलिसांनी आतापर्यंत ८ संशयितांना अटक केली आहे. दुसरीकडे, अंबाजोगाईत एका तरुणीच्या भावावर गोळीबार झाला. दोन्ही घटनांनी बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बीड जिल्हा पुन्हा एकदा हत्येच्या घटनेमुळे हादरला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील वाहिरा गावात दोन सख्ख्या भावांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आपापसातील वादातून घडलेल्या या घटनेमुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 8 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या वाहिरा या गावात आदिवासी समाजातील नातेवाईकात असलेल्या जुन्या वादातून ही घटना घडली आहे.
या घटनेत अजय भोसले आणि भरत भोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कृष्णा भोसले गंभीर जखमी असून त्याला अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. खून झालेले दोघे आणि जखमी असलेला कृष्णा हे सख्खे भाऊ आहेत. तर खून झालेले आणि ज्यांनी हल्ला केला या सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. दरम्यान, या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहेत. या गुन्ह्यातील हवे असलेले इतर गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिली आहे. या प्रकरणी आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी केली आहे.
अंबाजोगाईत गोळीबाराची घटना
विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत देखील अशीच घटना घडली आहे. पुण्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या तरुणीच्या भावावर गोळी झाडल्याची घटना घडली आहे. फिर्यादी तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकत प्रॉपर्टी हडप करण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. पोलिसांनी तातडीने धाव घेत आरोपींचा शोध घेतला आहे. बीड पोलिसांची दोन पथकं आरोपीच्या शोधात रवाना झाली. यानंतर आरोपी गणेश चव्हाण याला पोलिसांनी तातडीने अटक केल्याची माहिती आहे.
लातुर जिल्ह्यातल्या रेणापूर जवळ असलेल्या गोविंद नगर शिवारात हा आरोपी पिंकात लपून बसला होता. रेणापूर आणि अंबाजोगाई पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. लग्नासाठी दबाव आणि प्रॉपर्टीच्या वादातून आज सकाळी घरात असलेल्या युवतीच्या भावावर गोळी झाडण्यात आली होती. सुदैवाने यामध्ये कसलीही हानी झालेली नाही.