AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांच्या अहंकाराचा गाडा रोखला गेला, ‘सामना’तून मोदींवर टीकास्त्र

लोकसभा निवडणून २०२४ चे निकाल हाती आल्यानंतर संपूर्ण देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. एनडीएला बहुमत मिळाले असले भाजपला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हा निर्भेळ विजय म्हणता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका करण्यात आली आहे.

त्यांच्या अहंकाराचा गाडा रोखला गेला, 'सामना'तून मोदींवर टीकास्त्र
| Updated on: Jun 05, 2024 | 8:00 AM
Share

लोकसभा निवडणून २०२४ चे निकाल हाती आल्यानंतर संपूर्ण देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. एनडीएला बहुमत मिळाले असले भाजपला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हा निर्भेळ विजय म्हणता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. देशाच्या जनतेने अहंकारी मोदी व त्यांच्या अमित शहांना निरोप दिला आहे. त्यांच्या अहंकाराचा गाडा रोखला आहे, असे म्हणत मोदींवर तोफा डागण्यात आल्या आहेत. सत्ता टिकविण्यासाठी पुन्हा भ्रष्ट मार्गाचा, फोडाफोडीचा मार्ग स्वीकारला तर लोकांचा उद्रेक रस्त्यावर येईल असा इशाराही या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

देशातील लोकशाहीचा अफाट विजय झाला आहे. देशाच्या जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. स्वतःला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदी या व्यक्तीचा दारुण पराभव भारतीय जनतेने केला आहे. हा लोकशाहीने हुकूमशाही, झुंडशाहीवर मिळवलेला विजय असेच म्हणावे लागेल. नरेंद्र मोदी यांचा ‘चारशे पार’चा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला, असा हल्ला या अग्रलेखातून चढवण्यात आला आहे.

काय म्हटलं आहे ‘सामना’च्या अग्रलेखात ?

देव जागा आहे…

स्वतःला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदी या व्यक्तीचा दारुण पराभव भारतीय जनतेने केला आहे. हा लोकशाहीने हुकूमशाही, झुंडशाहीवर मिळवलेला विजय असेच म्हणावे लागेल. नरेंद्र मोदी यांचा ‘चारशे पार’चा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला. लोक सार्वभौम आहेत. लोकशाहीचे संरक्षणकर्ते शेवटी लोकच असतात हे भारताने दाखवून दिले. चारशे जागा निवडून द्या. नव्हे, चारशे जागा निवडून आणणारच या अहंकारास शेवटी भारतीय जनतेने पायदळी तुडवले. खुद्द वाराणसीत नरेंद्र मोदी हे सुरुवातीस पिछाडीवर पडले तेव्हा देव जागा आहे हे दिसून आले. नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडगोळीने भारत देशाचा तुरुंग केला होता. जनतेलाही मोकळेपणाने बोलण्याचे व वावरण्याचे स्वातंत्र्य नव्हते. विरोधात बोलणाऱ्यांना सरळ तुरुंगात टाकले गेले. दिल्ली, झारखंडच्या बहुमतातील मुख्यमंत्र्यांना सरळ तुरुंगात टाकणाऱ्या मोदी-शहांनी भारतीय जनता पक्षाचे ‘वॉशिंग’ मशीन केले. देशातील सर्व पक्षांतील भ्रष्ट नेत्यांना भाजपात आणून ‘आयेगा तो मोदी ही’ हा नारा देणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली. लोकसभा निवडणुकांचे निकाल हाच जनादेश आहे. या जनादेशाचा आदर नरेंद्र मोदी करणार आहेत काय ?

मोदींच्या अहंकाराचा गाडा रोखण्याचे काम महाराष्ट्राने केले

भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही हे पहिले सत्य व तथाकथित ‘एनडीए’च्या बहुमताचा आकडा काठावर आहे. म्हणजे ‘चारशे पार’च्या रथावर स्वार होऊ पाहणाऱया मोदी यांना रिक्षात बसून रायसिना हिलवर फिरावे लागेल. देशाचे चित्र स्पष्ट झाले आहे. ज्या उत्तर प्रदेशात राममंदिराचे राजकारण करून मोदी स्वतःला हिंदूंचे नवे शंकराचार्य म्हणून प्रस्थापित करू पाहत होते त्या उत्तर प्रदेशात मोदी व भाजपास सगळ्यात मोठा हादरा बसला आहे. उत्तर प्रदेशातील 80 जागांपैकी 40 जागांवर समाजवादी पार्टी व काँग्रेसने आघाडी घेतली. अमेठीत स्मृती इराणी यांचा पराभव शेवटी राहुल गांधी यांच्या सामान्य कार्यकर्त्याने केला. रायबरेलीत राहुल गांधी स्वतः विजयी झाले. मोदी यांच्या अहंकाराचा गाडा रोखण्याचे काम शेवटी उत्तर प्रदेश व महाराष्ट्राने केले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडून मोदी-शहांनी घाणेरडे राजकारण केले. शिवसेना-राष्ट्रवादी फोडण्याने महाराष्ट्रात एकतर्फी विजय मिळवता येईल या भ्रमाचा भोपळा मराठी जनतेने फोडला. सत्तेचा अमर्याद वापर, पैशांचा ‘धो-धो’ पाऊस ‘मिंधे’ सेनेने पाडला. अजित पवारांनी अनेक मतदारसंघांत धमक्या दिल्या, दहशत केली. फडणवीसांनी अनाजीपंतांचे राजकारण केले. या सगळ्या कारस्थानांचा पराभव महाराष्ट्राने केला. मोदी-शहांनी मिळून महाराष्ट्रात पन्नास सभा घेतल्या, पण हाती काहीच लागले नाही. महाराष्ट्रात भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला.

वल्गना करणाऱ्यांचे दात घशात 

शिवसेनेच्या काही हक्कांच्या जागेवर अपयश आले. अर्थात शिवसेनेने विषम परिस्थितीत संघर्ष केला. पक्ष गेला, चिन्ह गेले, आर्थिक ताकद नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेने दोन आकड्यांत जागा जिंकल्या. महाविकास आघाडी म्हणून 30 जागा जिंकणे हा धनशक्ती व सरकारी यंत्रणेचा पराभव आहे. केरळ, प. बंगाल, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश ही राज्ये भाजपच्या पाठीशी राहिली नाहीत. तामीळनाडूने तोच मार्ग स्वीकारला. आंध्रात जगनमोहन रेड्डी व त्यांचा पक्ष पराभूत झाला. तेथे तेलुगू देसम व चंद्राबाबूंनी उसळी मारली. कर्नाटक, बिहारात ‘इंडिया’ आघाडीस अपेक्षित यश मिळाले नाही. ते मिळाले असते तर ‘इंडिया’ आघाडीला बहुमताचा आकडा सहज पार करता आला असता. तसे घडले नाही तरीही मोदींच्या अहंकाराचा रथ चिखलात अडकला. मोदी व त्यांचे लोक तिसऱ्यांदा दिग्विजय प्राप्त करतील असे नगारे वाजवणारे आता थंड पडले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला पन्नास जागाही मिळणार नाहीत अशा वल्गना करणाऱ्यांचे दात घशात गेले. मोदी यांचे तथाकथित देवत्वाचे पितळ उघडे पडले.

दिल्लीत पुढे काय होणार, हा प्रश्न महत्त्वाचा. अल्पमतातल्या ‘एनडीए’चे नेतृत्व स्वीकारून मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घ्यायला पुढे जातील काय? सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप नक्कीच पुढे आला, पण त्यांच्या एनडीएचे बहुमत हे टेकूवरचे आहे व ते टेकूही डळमळीत आहेत. देशाच्या जनतेने अहंकारी मोदी व त्यांच्या अमित शहांना निरोप दिला आहे. त्यांच्या अहंकाराचा गाडा रोखला आहे. सत्ता टिकविण्यासाठी पुन्हा भ्रष्ट मार्गाचा, फोडाफोडीचा मार्ग स्वीकारला तर लोकांचा उद्रेक रस्त्यावर येईल. देशातील लोकशाहीचा अफाट, अपूर्व, अलौकिक विजय झाला आहे. देशाच्या जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, तो तसाच राहील.

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.