गेल्या 18 वर्षांत अजय देवगण बोललाच नाही, मेसेजलाही उत्तर नाही; दिग्दर्शकाची खंत
'थप्पड', 'आर्टिकल 15', 'रा-वन' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अजय देवगणसोबतच्या मैत्रीबाबत खुलासा केला. गेल्या 18 वर्षांपासून अजय बोलत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी 2007 मध्ये ‘कॅश’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यात अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका होती. त्यासोबत सुनील शेट्टी, ईशा देओल, रितेश देशमुख, जायेद खान, शमिता शेट्टी आणि दिया मिर्झा यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटानंतर अनुभव यांनी अजयसोबत पुन्हा कधीच काम केलं नाही. त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाल्याच्या चर्चांना उधाण आलं. यावर आता 18 वर्षांनंतर अनुभव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या 18 वर्षांपासून अजय देवगणशी बोलत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे तो माझ्या मेसेजेसना उत्तर देत नाही, असाही खुलासा त्यांनी केला आहे.
मेसेजलाही उत्तर नाही
‘लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अनुभव म्हणाले, “आमच्यात भांडण झालं नाही. फक्त तो माझ्याशी बोलत नाही आणि त्यामागचं कारण मलाही माहीत नाही. कॅश या चित्रपटानंतर आम्ही भेटलोसुद्धा नाही. त्यामुळे तो मला जाणूनबुजून दुर्लक्ष करतोय, असंही मी तुम्हाला सांगू शकत नाही. कदाचित हे माझे अतिविचार असतील. पण मी त्याला मेसेज केले होते. त्याच्याकडून माझ्या मेसेजला रिप्लाय कधीच मिळाला नाही. त्यामुळे कदाचित त्याने मेसेज पाहिले नसावेत, अशी मी स्वत:ची समजून काढतोय. पण गेल्या 18 वर्षांपासून आमच्यात अजिबात संवाद झाला नाही.”
कोणत्या कारणावरून मतभेद?
अजय देवगणसोबत कधी मतभेद झाले होते, असा प्रश्न विचारल्यावर ते लगेचच म्हणाले, “आमच्यात कोणतेच मतभेद नव्हते. निर्माते आणि भांडवलदार यांच्यात मतभेद होते. मी या दोघांपैकी कोणीच नव्हतो. एका गाण्यावरून आमच्यात वाद झाल्याची चर्चा होती. पण असं काहीच नाहीये. माझ्या माहितीनुसार, आमच्यात कोणत्याच गाण्यावरून वाद झाले नव्हते. वादाच्या चर्चा खऱ्या नाहीत. अजय हा माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहे. अभिनेता आणि व्यक्ती म्हणून मला तो खूप आवडतो. तो एक चांगला मित्र आहे. एखाद्या मित्राला काही गरज लागली तर सर्वांत आधी तो मदतीला धावून जातो.”




अनुभव सिन्हा यांनी मध्यंतरीच्या काळात काही लोकांच्या राजकीय विचारांवरून टिप्पण्या केल्या होत्या. त्यामुळे अजय नाराज झाल्याचं म्हटलं जात होतं. त्यावर उत्तर देताना अनुभव यांनी सांगितलं, “लोकांच्या राजकीय विचारांबद्दल मी मध्यंतरी टिप्पणी केली होती. कदाचित मी त्यालाही काहीतरी म्हटलं असेन. पण मी फक्त त्याच्याचबद्दल प्रतिक्रिया दिली नव्हती. मी इतरही लोकांबद्दल म्हटलं होतं आणि त्यांच्यासोबत माझे संबंध आजही चांगले आहेत. एक अभिनेता आणि माणूस म्हणून मी अजयचा खूप आदर करतो.”