Bigg Boss 19 Winner : ‘बिग बॉस 19’ विजेत्याची घोषणा; या स्पर्धकाने पटकावली ट्रॉफी
Bigg Boss 19 Winner : ऑगस्ट महिन्यात सुरू झालेला 'बिग बॉस'चा एकोणिसावा सिझन अखेर संपुष्टात आला आहे. 7 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये विजेत्याची घोषणा करण्यात आली. या स्पर्धकाने इतर चौघांना मात देत बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली आहे.

Bigg Boss 19 Winner : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्ना याने ‘बिग बॉस 19’चं विजेतेपद पटकावलं आहे. ऑगस्ट महिन्यात बिग बॉसचा एकोणिसावा सिझन सुरू झाला होता. त्याची सांगता आज (7 डिसेंबर 2025) झाली. यंदाच्या सिझनमध्ये 16 स्पर्धक आणि दोन वाइल्ड कार्ड एण्ट्री मिळूण एकूण 18 जण सहभागी होते. त्यापैकी ग्रँड फिनालेमध्ये गौरव खन्ना, फरहाना भट्ट, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि तान्या मित्तल हे पाच जण पोहोचले. ग्रँड फिनालेच्या एपिसोडमध्ये अमाल मलिक पाचव्या आणि तान्या मित्तल चौथ्या स्थानावर घराबाहेर पडले. टॉप 3 मध्ये अंतिम चुरस रंगली असताना मराठमोळ्या प्रणित मोरेचा बिग बॉसमधील प्रवास संपला. त्यानंतर फरहाना भट्टला मात देत गौरवने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली आहे.
विजेता ठरलेल्या गौरव खन्नाला 50 लाख रुपये बक्षीस आणि बिग बॉसची ट्रॉफी देण्यात आली आहे. बिग बॉसच्या घरात चौदा आठवडे टिकणं ही काही सहजसोपी गोष्ट नाही. त्यासाठी या स्पर्धकांना शोचे कठोर नियम, नियमांना धरून बनवलेला फॉरमॅट या सर्वांचं काटेकोरपणे पालन करावं लागलं आहे. त्याचसोबत आपल्या खेळीने प्रेक्षकांची मनं कशी जिंकता येतील, याचंही भान त्यांना ठेवावं लागलं आहे. यंदाच्या सिझनमध्ये गौरव अगदी पहिल्या एपिसोडपासून चर्चेत होता.
View this post on Instagram
बिग बॉस म्हटलं की ड्रामा, भांडणं आणि आरडाओरड हे सर्व आलंच. या शोची ओळखच तशी असल्याने गौरवच्या शांत खेळीची खिल्ली उडवण्यात आली होती. पण जसजसा खेळ पुढे गेला, तसतसा गौरव बिग बॉसच्या घरातील स्ट्राँग स्पर्धक ठरला. फिनालेमध्ये आपली जागा निश्चित करणारा तो पहिला स्पर्धक ठरला होता. तिकिट टू फिनाले जिंकल्यानंतर आता गौरवने विजेतेपदही पटकावलं आहे.
बिग बॉस 19’साठी गौरव खन्नाला सर्वाधिक मानधन मिळाल्याचंही कळतंय. जीके म्हणून ओळखला जाणारा गौरव हा चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. गौरवला प्रत्येक आठवड्यासाठी जवळपास 17.5 लाख रुपये मानधन मिळालं आहे. म्हणजेच चौदा आठवड्यांमध्ये त्याने तब्बल 2.45 कोटी रुपये कमावले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, गौरवची एकूण संपत्ती 15 ते 18 कोटी रुपये इतकी आहे.
