‘ट्रम्पला किती टॅरिफ हवा…’, सलमाननंतर गायकाने घेतली डोनाल्ड ट्रम्पची फिरकी
सलमान खाननंतर आता प्रसिद्ध गायकाने डोनाल्ड ट्रम्पची फिरकी घेतली आहे. 'अनफिनिश्ड यूएसए टूर'मध्ये करीना कपूरच्या हिट गाण्यासह या गायकाने टॅरिफचा उल्लेख केला, त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. पाहा हे गाणे कोणते...

डोनाल्ड ट्रम्पसाठी लोक अनेकदा ‘अनप्रेडिक्टेबल’ हा शब्द वापरतात. रात्री एक आणि दिवसा दुसरे अशी प्रतिमा असलेले डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यांनी एकीकडे पंतप्रधान मोदींना आपले खास मित्र म्हटले आणि दुसरीकडे रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर सेकंडरी टॅरिफ लावण्याची धमकी दिली. याचा थेट परिणाम भारतावर होणार आहे. याचदरम्यान, सलमान खाननंतर ‘अनफिनिश्ड यूएसए टूर’मधून लोकांची मने जिंकणाऱ्या बॉलिवूड गायक आणि रॅपर बादशाहने न्यू जर्सीमधील एका शोदरम्यान ट्रम्प यांची फिरकी घेतली आहे. त्याच्या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
बादशाहचा न्यू जर्सीमध्ये एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांना संगीत आणि नृत्यासोबतच एक जबरदस्त विनोदही ऐकायला मिळाला. खरेतर, बादशाहने स्टेजवरील परफॉर्मन्सदरम्यान अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पवर असा काही विनोद केला की संपूर्ण हॉल टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमला आणि हास्याची लाट पसरली.
वाचा: महागुरूंच्या तुफान ट्रोलिंगवर लेकीने शेवटी मन मोकळं केलं, म्हणाली शेवटी माझ्या बाबांना…
गाण्याचे बोल बदलून ट्रम्प यांना टोमणा
कॉन्सर्टमध्ये बादशाहने करीना, सोनम आणि स्वराच्या ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘तारीफां’ गायिले होते. गाणे गात असताना अचानक त्याचे बोल बदलले. गाण्याची मूळ ओळ ‘किन्नियां तारीफां चाहीदी ऐ तैनूं’ ऐवजी त्याने ‘किन्नी टॅरिफ चाहीए ट्रम्प को…’ (ट्रम्पला किती टॅरिफ हवे) असे म्हटले. हे ऐकताच प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या आणि हास्याने संपूर्ण माहोल गाजला. हा टोमणा अमेरिकेतील चालू असलेल्या टॅरिफ धोरण आणि व्यापार वादावर एक हलकासा विनोद मानला जात आहे.
सलमान खाननेही मारला होता टोमणा
काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननेही अप्रत्यक्षपणे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निधाणा साधला होता. ‘बिग बॉस 19’च्या वीकेंड एपिसोडमध्ये जेव्हा घरातील स्पर्धक भांडणात गुंतले होते, तेव्हा सलमान म्हणाला, ‘जो सर्वात जास्त गोंधळ घालत आहेत, त्यांनाच पीस प्राइज हवे आहे.’ सलमानची ही टिप्पणी तेव्हा चर्चेत होती आणि ती डोनाल्ड ट्रम्पच्या नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्याच्या इच्छेशी जोडली गेली.
