शोएब इब्राहिमची पहिली पत्नी कोण? दीपिकाचा खुलासा, म्हणाली “आमची भांडणं..”
'ससुराल सिमर का' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता एका पॉडकास्टमध्ये दीपिकाने थेट शोएबच्या पहिल्या पत्नीविषयी खुलासा केला आहे.

टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय जोडी दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतात. युट्यूबवरील व्लॉगद्वारे हे दोघं त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच दीपिकाने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये पती शोएबच्या पहिल्या पत्नीचा खुलासा केला आहे. इतकंच नव्हे तर दोघांच्या भांडणांमागचं कारण काय असतं, याबद्दलही तिने सांगितलं आहे. दीपिका आणि शोएब नुकतेच अभिनेत्री रश्मी देसाईच्या पॉडकास्टमध्ये पोहोचले होते. या पॉडकास्टमध्ये दीपिकाने शोएबच्या पहिल्या पत्नीचा खुलासा करताच रश्मीलाही आश्चर्याचा धक्का बसला.
“एक अशी गोष्ट सांगा, जी तुम्ही एकमेकांसाठी पहिल्या दिवसापासून करत आहात”, असा प्रश्न रश्मी या दोघांना विचारते. त्यावर उत्तर देताना दीपिका म्हणते, “माझं खूप स्पष्ट आहे. पण शोएबची एक सवय सर्वांत वाईट आहे, ते म्हणजे फोनचं व्यसन. त्याची पहिली पत्नी मोबाइल फोन आहे. यावरून आमची अनेकदा भांडणं होतात.” हे ऐकून शोएब म्हणतो, “याप्रकरणी मी दीपिकाशी जिंकू शकत नाही. त्यामुळे भांडणाच्या आधीच मी शरणागती पत्करतो. ही बिग बॉस जिंकून आली आहे आणि मी तिच्या मेंदूशी खेळू शकत नाही.”
View this post on Instagram
दीपिका आणि शोएब यांनी 2018 मध्ये लग्न केलं. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं. याच मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांना एक मुलगा आहे. दीपिकाचं हे दुसरं लग्न आहे. शोएबच्या आधी तिने रौनक सॅमसनशी लग्नगाठ बांधली होती. परंतु लग्नाच्या चार वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. शोएबशी लग्नानंतर दीपिकाने अभिनयातून ब्रेक घेतला. आंतरधर्मीय लग्नामुळे अनेकदा दीपिकाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.
दीपिकाला काही महिन्यांपूर्वी लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली होती. त्यानंतर तिच्यावर लिव्हर कॅन्सरची सर्जरी करण्यात आली. तब्बल 14 तासांच्या सर्जरीनंतर दीपिकाला काही तास आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर 11 दिवस ती रुग्णालयातच होती. आयुष्यातील या सर्वांत कठीण काळात दीपिकाचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिम आणि तिच्या कुटुंबीयांनी तिची खूप साथ दिली.
