‘एक दिन का सीएम’ला मुख्यमंत्री करा, चाहत्यांच्या मागणीवर अनिल कपूर म्हणतात…

‘नायक’ चित्रपटात ‘एक दिन का सीएम’ झालेले प्रख्यात अभिनेते अनिल कपूर यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी नेटिझन्सनी केली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:04 PM, 1 Nov 2019
Anil Kapoor One Day CM

मुंबई : विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला एकहाती बहुमत न मिळाल्यामुळे सत्तास्थापनेचं त्रांगडं निर्माण झालं आहे. मुख्यमंत्रिपद आणि सत्तेच्या समान वाटपावरुन शिवसेना-भाजपच्या अडलेल्या चर्चेला कधीचा मुहूर्त मिळणार माहिती नाही. पण सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस सुरु आहे. ‘नायक’ चित्रपटात ‘एक दिन का सीएम’ झालेले प्रख्यात अभिनेते अनिल कपूर यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी (Anil Kapoor One Day CM) नेटिझन्सनी केली आहे.

‘महाराष्ट्रात मार्ग सापडेपर्यंत अनिल कपूर यांनाच मुख्यमंत्री करुन बघूयात. मोठ्या पडद्यावर त्यांचा एक दिवसाचा कार्यकाळ अख्ख्या देशाने पाहिला आहे आणि त्याचं कौतुकही केलं आहे. काय म्हणता देवेंद्र फडणवीसजी आणि आदित्य ठाकरेजी’ अशा आशयाचं ट्वीट विजय गुप्ता नावाच्या एका ट्विटराईटने केलं आहे. यामध्ये त्याने अनिल कपूर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनाही टॅग केलं आहे.

विजयचा ट्वीट कोट करत अनिल कपूर यांनी उत्तर दिलं आहे. ‘मी नायक म्हणूनच ठीक आहे’ असं उत्तर देत गॉगल घातलेला इमोजी अनिल कपूर यांनी पोस्ट केला आहे.

निवडणुकांपूर्वी औरंगाबादेत पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे या दोघांचंही अनिल कपूर यांनी भरभरुन कौतुक केलं होतं.

‘आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मला खऱ्या आयुष्यातील ‘नायक’ दिसतो. दोघेही तरुण आहेत, तडफदार आहेत, अभ्यासू आहेत. आगामी काळात देशातील राजकारणाला अशाच ‘नायकां’ची गरज आहे.’ अशी अपेक्षा अनिल कपूर यांनी व्यक्त केली होती.

बाळासाहेबांपासून माझे ठाकरे कुटुंबियांशी चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडवीस यांच्याशीही आपला चांगला परिचय आहे. त्यामुळे हे दोघंही महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील असा मला विश्वास आहे.’ अशा भावना अनिल कपूर यांनी व्यक्त केल्या होत्या.

‘उच्चशिक्षित व्यक्ती, तरुणांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. अभ्यासू आणि तरुण राजकारणी देशाची परिस्थिती सुधारु शकतात’ असं मत अनिल कपूर यांनी व्यक्त केलं होतं.

ठाकरे की फडणवीस? मनातला ‘नायक’ कोण? औरंगाबादेत अनिल कपूरने उत्तर दिलं

युती हा चर्चेचा मुद्दा नाही. युवकांनी सरकार चालवावं, असं मला वाटतं. तरुणांमध्ये प्रचंड उर्जा असते. आताची पिढी संवेदनशील आहे, तितकीच आक्रमकही आहे. त्यांनी राजकारणात येऊन काम करावं’ अशी इच्छा अनिल कपूर यांनी व्यक्त केली होती.

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नायक’ चित्रपटात अभिनेते अमरिश पुरी यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली होती. मुलाखत घेणारा पत्रकार त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारतो, तेव्हा तूच एक दिवसाचा मुख्यमंत्री का होत नाहीस? असं चॅलेंज ते देतात. हे आव्हान स्वीकारणारा अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो, असं या चित्रपटाचं कथानक (Anil Kapoor One Day CM) आहे.