दीड तास खिळवून ठेवणारी चिमुकली- पिहू

  • Updated On - 5:02 pm, Fri, 5 July 19
दीड तास खिळवून ठेवणारी चिमुकली- पिहू

Pihu movie review:  बॉलिवूडमध्ये आज केवळ एकाच सिनेमाची चर्चा आहे, ती म्हणजे व्हर्सटाईल दिग्दर्शक विनोद कापरी यांच्या ‘पिहू’ची. ट्रेलर रिलीज झाल्यापासून सिनेजगत अक्षरश: या सिनेमाची वाट पाहात होते. आज हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात दोन वर्षांच्या मायरा विश्वकर्मा या चिमुकलीने अभिनय केला आहे. इतक्या लहान वयात मुख्य भूमिका साकारणाऱ्या मायराने विश्वविक्रम केला आहे.

पिहू हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. दोन वर्षांच्या पिहूच्या अभिनयाने सर्वच जण अवाक् झाले आहेत. एवढ्या लहान वयातील चिमुकलीने अभिनय कसा केला? आणि दिग्दर्शकाने हा अभिनय कसा करवून घेतला असे प्रश्न सर्वांना पडले आहेत.

पिहू हा सिनेमा पिहू (मायरा विश्वकर्मा) नावाच्या मुलीचा सिनेमा आहे.  पिहू एक दिवस घरात एकटीच असते. पिहू इकडे तिकडे घरातच फिरत असते. बेडवर तिची आई असते, पण ती जिवंत नाही. आपली आई जिवंत नाही याची जाणीव लहानग्या पिहूला नाही. मेलेल्या आईच्या अवतीभवती पिहू फिरत असते. कधी आईला उठवण्याचा प्रयत्न करते, तर कधी भूक लागली म्हणून खाऊ मागते. खायला मिळत नाही त्यामुळे चिमुकली पिहू स्वत:च तव्यावर रोटी करण्याचा प्रयत्न करते. हा सगळा प्रकार असा चित्रीत करण्यात आला आहे की प्रेक्षक एक क्षणही स्क्रीनवरुन नजर हटवू शकत नाही.

पिहूने असे काही सीन दिले आहेत, जे पाहून तुम्हाला काय रिअॅक्ट व्हावं हे कळणारही नाही. विशेषत: पिहू स्वत:ला फ्रीजमध्ये बंद करुन घेते, तेव्हा सर्वांचाच थरकाप उडतो.

पिहूच्या आईच्या शरिरावर जखमाही आहेत. बोबड्या बोलीत पिहू आईकडे खायला मागते, तर कधी बाल्कनीतून डोकावते. पिहू बाल्कनीत जाऊन ग्रीलवर चढते, तेव्हा सिनेगृहातील प्रत्येकाची इच्छा पिहूला वाचवण्याचीच असते. हा सीन पाहून प्रत्येकाला आपल्या मुलांची आठवण येतेच येते.

अवघ्या दीड तासांचा सिनेमा पाहताना एक मिनिटही तुम्ही चुळबूळ करु शकणार नाही. संपूर्ण सिनेमा तुम्हाला खिळवून ठेवतो. थिएटरमधून बाहेर येताना तुम्हाला कुटुंब म्हणजे काय, लहान मुलं, पत्नी आणि जबाबदारीची जाणीव या सर्वांची अनुभूती येईल.

सिनेमा का पाहायला हवा?
हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. ही सत्यकथा पडद्यावर ज्या पद्धतीने मांडली आहे ती कौतुकास्पद आहे. पिहू पाहताना तिला मदत मिळावी, मदत करावी, असे भावना होते. अनेकवेळा भावनिक क्षण येतात. जसजसा सिनेमा पुढे जाईल, तसतसा आपण थक्क होत राहतो. पिहूने स्वत:च स्वयंपाकघरात जाऊन केलेला प्रयत्न असो किंवा फ्रीजमध्ये जाणं असो, सर्व काही थरारक आहे. दीड तास एकच पात्र आपल्याला खिळवून ठेवतं, त्यामुळे दिग्दर्शकाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे.

पिहूच्या आईला नेमकं काय झालं? पिहूचं काय होतं? पिहूने अभिनय कसा केला? हा सर्व थरार अनुभवायचा असेल तर पैसा वसूल करणारी पिहू पाहायलाच हवी.  या सिनेमाला आम्ही देतोय 5 स्टार.

सिनेमा: पीहू
मुख्य भूमिका – मायरा विश्वकर्मा (पिहू)
दिग्दर्शक – विनोद कापरी
निर्माते – रोनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर
रेटिंग – 5 स्टार