Ayesha Khan: ‘राजू बन गया जेंटलमॅन’मधील प्रसिद्ध अभिनेत्री आयशा खान यांचे निधन, सडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि नाना पाटेकर यांच्यासोबत काम करणारी अभिनेत्री आयशा खान यांचे निधन झाले आहे.

प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आयशा खान यांचे बुधवारी, 18 जून 2025 रोजी कराचीतील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये निधन झाले. त्या 76 वर्षांच्या होत्या. त्यांचा मृतदेह त्यांच्या निधनानंतर एका आठवड्याने आढळला. शेजाऱ्यांना घरातून दुर्गंध येत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना कळवले होते.
अहवालानुसार, पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अभिनेत्रीचा मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती, ज्यामुळे त्यांचे निधन काही दिवसांपूर्वीच झाले असल्याचे स्पष्ट झाले. आयशा खान यांच्या निधनाच्या कारणांचा तपास सुरू आहे. पोलीस शेजारी आणि नातेवाइकांकडून माहिती गोळा करत आहेत.
आयशा खान यांच्या निधनाचे कारण
आयशा खान गेल्या अनेक वर्षांपासून एकट्याच राहत होत्या. असे म्हटले जाते की त्या आरोग्याशी संबंधित समस्यांशी झुंजत होत्या. त्या प्रसिद्धीपासून दूर होत्या. त्यांच्या पार्थिव शरीराला निधनाच्या खऱ्या कारणांचा शोध घेण्यासाठी जिन्ना पोस्टग्रॅज्युएट मेडिकल सेंटरमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे.
अनेक शो आणि चित्रपटांमध्ये केले काम
आयशा खान यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 रोजी झाला होता. ‘आखिरी चट्टान’, ‘टीपू सुल्तान: द टायगर लॉर्ड’, ‘दहलीज’, ‘बोल मेरी मछली’ आणि ‘एक और आसमां’ या मालिकांमधील त्यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली होती. त्या ‘मुस्कान’, ‘फातिमा’ आणि भारतीय चित्रपट ‘राजू बन गया जेंटलमॅन’ यामध्येही काम केले होते. त्या दिवंगत अभिनेत्री खालिदा रियासत यांच्या मोठ्या बहीण होत्या, ज्या पाकिस्तानी टीव्ही इंडस्ट्रीतील मोठे नाव होत्या.