तब्बल 11 वर्षांनंतर सर्वांत लोकप्रिय मालिका होणार बंद; चाहत्यांना बसला धक्का!
गेल्या 11 वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका अखेर बंद होणार आहे. ही मालिका कोणती आणि त्याचा शेवटचा एपिसोड कधी प्रसारित होईल, याविषयीची सविस्तर माहिती जाणून घ्या..

छोट्या पडद्यावरील काही मालिकांना प्रेक्षकांकडून अनेक वर्षांपासून भरभरून प्रेम मिळालं. काही मालिका अवघ्या काही महिन्यांतच आपला गाशा गुंडाळतात, तर काही मालिका वर्षानुवर्षे टिकून राहतात. अशीच एक मालिका गेल्या 11 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. परंतु आता या लोकप्रिय मालिकेचाही प्रवास संपुष्टात आला आहे. तब्बल 11 वर्षांनंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय. झी टीव्हीवरील या लोकप्रिय मालिकेचं नाव आहे ‘कुमकुम भाग्य’. गेल्या काही महिन्यांपासून सतत या मालिकेचा टीआरपी अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे ‘कुमकुम भाग्य’मधील चौथ्या पिढीची कथा प्रेक्षकांना आवडली नसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.
बंद होणार मालिका?
ही मालिका 2004 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर एक विशेष छाप सोडली आहे. सुरुवातीला अभिनेत्री श्रुती झा आणि शब्बीर आहलुवालिया यांच्या मुख्य भूमिका होत्या. या दोघांमधील जबरदस्त केमिस्ट्री आणि मालिकेच्या कथानकातील ट्विस्ट प्रेक्षकांना खूपच आवडले. बऱ्याच वर्षांपर्यंत ही मालिका टीआरपीच्या यादीत टॉप 5 मध्ये होती. परंतु गेल्या काही वर्षांत यातील बरेच कलाकार बदलले आणि त्यानुसार मालिकेच्या कथेचा ट्रॅकसुद्धा बदलला. श्रुती आणि शब्बीर आता या मालिकेत नाहीत. शिवाय कथेच बरेच लीपसुद्धा आले. सध्या प्रणाली राठोड, अक्षय बिंद्रा आणि नमिक पॉल यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही मालिका पुढच्या महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय.
View this post on Instagram
IWMBUZZ ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘कुमकुम भाग्य’च्या टीआरपीमध्ये सतत घसरण पहायला मिळतेय. त्यामुळे ही मालिका बंद करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. या मालिकेचा शेवटचा एपिसोड 7 सप्टेंबर 2025 रोजी प्रसारित होईल. त्यामुळे या मालिकेच्या 11 वर्षांच्या प्रवासाला सप्टेंबर महिन्यात पूर्णविराम लागणार आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला ही मालिका बंद करण्याचा प्लॅन नव्हता. जेव्हा निर्मात्यांनी संध्याकाळी 7 वाजताची वेळ या मालिकेला दिली, तेव्हा एकता कपूरने त्याचा स्वीकार करण्याऐवजी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. आता ‘कुमकुम भाग्य’च्या वेळेत ‘गंगा माई की बेटियाँ’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेत अभिनेत्री मृणाल ठाकूरने बुलबुलची भूमिका साकारली होती. तिलाही त्यातून प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि आता मृणाल मोठ्या पडद्यावर दमदार कामगिरी करत आहे.
