Sara Tendulkar : तेंडुलकराच्या घरी लगीनघाई ? सारा-अंजलीची साडी शॉपिंग, अर्जुनच्या पत्नीसाठी काय काय खरेदी?
विख्यात क्रिकेट सचिन तेंडुलकर याची पत्नी अंजली आणि सारा नुकत्याच शॉपिंग करताना दिसल्या. साड्यांच्या दुकानात तासनतास घालवल्यावर त्यांनी काही खास साड्या निवडल्या. भावी सूनबाई, अर्जुनची होणारी पत्नी सानिया हिच्यासाठीही त्यांनी साड्या विकत घेतल्याचे समजते.

क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आता लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. म्हणजेच तो आता सारेबुवा होणार आहे. त्याचा धाकटा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला. मुंबईतील अतिशय प्रतिष्ठित उद्योगपती रवी घई यांची नात असलेली सानिया चंडोक हिच्याशी अर्जुनची (arjun Tendulkar) एंगेजमेंट झाली असून लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे आता तेंडुलकर कुटुंबात लगीनघाई सुरू झाली असून लवकरच त्यांच्या घरी शहनाईचे सूर वाजताना ऐकू येतील अशी चर्चा आहे.
असं म्हणतात बनारसी साडीशिवाय लग्नाचा माहोल पूर्ण झाल्यासारखं वाटतं नाही. हे सर्वांनाच लागू होतं मग ते सर्वसामान्य कुटुंब असो की कोणी सेलिब्रिटी. सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली आणि लेक सारा (Sara Tendulkar) सध्या काशीच्या दौऱ्यावर असून, याचदरम्यान अंजली यांनी त्यांच्या लेकाच्या लग्नासाठी तसेच भावी सूनबाई, सानियासाठी काही साड्या खरेदी केल्या आहेत.
अंजली, साराने केलं साड्यांचं शॉपिंग
मिळालेल्या माहितीनुसार, अंजली तेंडुलकर यांनी होणारी सून सानिया चंडोक, त्यांच्या स्वत:साठी , लेक सारासाठी आणि काही नातेवाईंकासाठी देखील खास साड्यांची खरेदी केली. सारासह दोन दुकानात जाऊन अंजली यांनी खास कलेक्शन निवडलं,कित्येक तास दुकानात राहून, वेगवेगळ्या साड्या पाहून त्यांनी सर्वांसाठी सुंदर अशा साड्या निवडल्याचं समजतं. दोन्ही दुकाने पारंपारिक हातमाग साड्यांवर केंद्रित होती. बनारसी कारागिरांनी बनवलेल्या उत्कृष्ट हस्तनिर्मित साड्या पाहून अंजली आणि सारा अक्षरश: मंत्रमुग्ध झाल्या.
सोमवारी काशीमध्ये पोहोचल्यानंतर, अंजली आणि सारा यांनी ज्येष्ठ पुजारी पंडित श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा श्री काशी विश्वनाथ यांचे दर्शन घेतले आणि पूजा केली. मंदिराच्या अन्नक्षेत्रात, त्यांनी सामान्य भाविकांप्रमाणे जमिनीवर बसून प्रसाद ग्रहण केला. सीईओ विश्वभूषण मिश्रा आणि एसडीएम शंभूशरण यांच्यासोबत, त्यांनी मंदिर संकुलाचा दौरा केला आणि त्याच्या विस्ताराची कहाणी ऐकली. त्या दोघींनी पीली कोठी येथे असलेल्या अब्दुल मतीन अँड कंपनी या साडी प्रतिष्ठानाला भेट दिली आणि हातमागावरच्या साड्या दाखविण्याची विनंतीही केली.
संस्थेचे संचालक इम्रान मतीन यांच्या सांगण्यानुसार, अंजली व सारा या दोघींनी बनारसी साड्या जवळून पाहिल्या आणि विणकामाचे कौतुक केले. त्यांनी कारागिरीची प्रशंसा केली आणि त्यांना जे जे आवडलं ते खरेदी केलं. दुसऱ्या दिवशी, अंजली आणि सारा गोलघरमधील धनवर्षा साड्यांमध्ये गेल्या. त्या नेहमीच्या ग्राहकांप्रमाणे दुकानात बसल्या आणि भरतकाम केलेल्या, ब्रोकेड आणि टिश्यू बनारसी साड्या पाहत होत्या. धनवर्षा सिल्कचे श्याम कपूर म्हणाले की, अंजली यांनी मुख्य लग्न समारंभ, मेहंदी समारंभ आणि रिसेप्शनसाठी वेगवेगळ्या थीम्सना अनुकूल असलेल्या प्रीमियम कलेक्शनमधून साड्या निवडल्या. त्यांना पारंपारिक डिझाईन्समध्ये खूप रस होता. अंजली आणि साराच्या दोघींना राजेशाही रंग खूप आवडले. त्यांनी अनेक साड्या ऑर्डर केल्या तसेच गुणवत्ता, कलेक्शन आणि सेवेचे कौतुक केले. एवढंच नव्हे तर शापिंग दरम्यान त्यांनी दुकानात दीना चाटचाही आस्वाद घेतला.
अर्जुन – सानियाचा साखरपुडा
साधारण चार महिन्यापूर्वी, ऑगस्ट महिन्यात सचिनचा लाडका लेक अर्जुन तेंडुलकर आणि प्रसिद्ध उद्योगपती रवि घई यांची नात सानिया चंडोक यांचा साखरपुडा झाला. अत्यंत खासगी अशा समारभांत दोन्ही कुटुंब, त्यांचे जवळचे नातेवाईक आणि काही खास मित्र-मैत्रिणी एवढेच लोक उपस्थित होते. त्यानंतर “आस्क मी एनीथिंग” या सेशनमध्ये सचिन तेंडुलकरला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आल्यावर, त्याने अर्जुनच्या साखरपुड्याच्या वृत्ताला पुष्टी दिली.
सचिनचा मुलगा अर्जुन आणि त्याची होणारी सून सानिया हे दोघे मात्र इन्स्टाग्रामवर फारसे ॲक्टिव्ह दिसत नाहीत. सानिया चांडोक ही घई कुटुंबातील आहे, जे मुंबईतील एक मोठे व्यावसायिक कुटुंब आहे. सानिया ही प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात आहे.रवी घई हे इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी (कमी कॅलरीज असलेले आईस्क्रीम ब्रँड) चे मालक आहेत. अर्जुनची भावी पत्नी सानिया ही मुंबईस्थित मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपीची संचालक आहे. दोघेही बालपणीचे मित्र आहेत.
