कोण आहे सिनेमातील खलनायक सदाशिव अमरापूरकर यांची लेक? इंडस्ट्रीत वडिलांचं नाव करतेय मोठं
सदाशिव अमरापूरकर यांची लेक रीमा अमरापूरकर इंडस्ट्रीत सध्या काय काम करते, वडिलांचा वारसा तिने कसा पुढे नेला, सदाशिव अमरापूरकर यांच्यानंतर कुटुंबाची जबाबदारी तिने कशी आपल्या खांद्यावर घेतली, याबाबत जाणून घेऊयात..

अभिनेते सदाशिव अमरापूरकर जरी या जगात नसले तरी सिनेविश्वात त्यांनी आपल्या दमदार अभिनयकौशल्याची जी छाप सोडली, त्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. विशेषकरून त्यांनी साकारलेल्या खलनायक भूमिकांची तोड कशालाच नाही. प्रेक्षकांना त्यांच्या पडद्यावरील भूमिका पाहून अक्षरश: राग यावा, चीड यावी, संताप यावा.. इतक्या ताकदीने त्यांनी साकारल्या होत्या. सदाशिव अमरापूरकर यांच्यानंतर आता त्यांची लेक इंडस्ट्रीत त्यांचं नाव मोठं करतेय. त्यांच्या मुलीचं नाव रीमा अमरापूरकर आहे. सदाशिव यांच्याप्रमाणे ती अभिनय क्षेत्रात काम करत नसली तरी इंडस्ट्रीतील एका वेगळ्या क्षेत्रात ती उल्लेखनीय कामगिरी करतेय.
1973 मध्ये सदाशिव यांनी सुनंदा करमरकर यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना रीमा ही मुलगी आहे. अभिनयक्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी केल्यानंतर सदाशिव अमरापूरकर यांचं 2014 मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनापूर्वीच रीमाने कॅमेरामागे राहून सहाय्यक दिग्दर्शकाचं काम करण्यास सुरुवात केली होती. रीमा अभिनय नव्हे तर दिग्दर्शन क्षेत्रात वडिलांचं नाव मोठं करतेय. तिने हिंदी चित्रपटांसाठीही काम केलंय. यामध्ये बाबुल (2006), ‘धमाल’ (2007) यांचा समावेश आहे. सदाशिव अमरापूरकर यांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न तिने केला आहे. वडिलांच्या निधनानंतर आई आणि कुटुंबाची जबाबदारी तिने आपल्या खांद्यांवर घेतली आहे.
हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये दिग्दर्शक, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर आता रीमा तिच्या युट्यूब चॅनलवर पॉडकास्ट चालवते. एमयू. पो. मनोरंजन असं तिच्या चॅनलचं नाव असून या चॅनलचे 13.5 हजार सबस्क्राइबर्स आहेत. या पॉडकास्टमध्ये ती चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांच्या मुलाखती घेताना दिसते.

सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म 11 मे 1950 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये झाला. एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या सदाशिव यांना त्यांचे जवळचे मित्र प्रेमाने ‘तात्या’ म्हणत. सदाशिव लहानपणापासून असहाय लोकांना मदत करत असत आणि त्यांना सुरुवातीपासूनच अभिनय करण्याची इच्छा होती. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी मराठी नाटकांतून अभिनयाला सुरुवात केली आणि जवळपास 50 नाटकांनंतर चित्रपटांच्या दुनियेत पाऊल ठेवलं. सदाशिव यांचा शेवटचा हिंदी चित्रपट दिबाकर बॅनर्जींचा ‘बॉम्बे टॉकीज’ होता, ज्यात त्यांनी छोटीशी भूमिका साकारली केली होती. सदाशिव यांना वयाच्या 64व्या वर्षी फुफ्फुसात संसर्ग झाल्याचं निदान झालं होतं, ज्यामुळे 3 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांचं निधन झालं.
