उघडं अंग, फाटकी जीन्स बनली फॅशन, 28 वर्षांपूर्वीच्या सलमानच्या या गाण्यावर तरूणी आजही फिदा
सलमान खानने करिअरच्या सुरूवातीपासूनच अशी अनेक क्लासिक, सुपरहिट गाणी दिलीत जी आजही प्रेक्षकांच्या मनात वाजत असतात. यापैकीच एक म्हणजे हे गाण. या चित्रपटात सलामनसोबत काजोलची प्रमुख भूमिका होती.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरने तिच्या करिअरमध्ये अनेक मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलंय, पण सलमान खानसोबत काम करतानाचे, त्या शूटिंगचे क्षण तिला आजही आठवतात इतके ते खास आहेत. याच दरम्यान करिश्माने ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीजन 5’ या रिॲलिटी शोमध्ये बोलताना ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटातील अतिशय प्रसिद्ध ‘ओ ओ जाने जाना’ या गाण्याच्या शूटिंगचा एक किस्सा शेअर केला. त्यावेळी सलमान खान हा अनेक शिफ्ट्समध्ये काम करत होता, त्यामुळेच तो खूप थकायचा देखील. या गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्याच्याकडे खूप कमी वेळ हातात होतात, पण तरीही त्याने मन लावून ते शूट केलं. हे गाणं इतकं गाजलं की क्लासिक बनलं, इतक्या वर्षांनंतरही ते अनेक प्रेक्षकांचा आवडत प्रेमगीत आहे.
सलमानच शेड्युल खूप बिझी होतं, तरीही त्याने त्याच्या अदा आणि स्टाइलने परफॉर्म करत या गाण्यात धमाल केली, असं करिश्माने नमूद केलं. त्यामुळे हे गाणं चार्टबस्टर ठरलं, खूप गाजलं. सध्या करिश्मा कपूर ही ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीजन 5’मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. नुकत्याच आलेल्या भागात प्रथमेश या स्पर्धकाने सलमान खानच्या ओ ओ जाने जाना’ या सुपरहिट गाण्यावर शानदार डान्स केला. त्याचा परफॉर्मन्स करिश्माला खूप आवडला, ती इतकी प्रभावित झाली की तिने त्याच्यासाठी उभं राहून टाळ्या वाजवत कौतुक केलं. त्यानंतर तिने सलमानशी निगडीत जुने किस्से, आठवणी सांगितल्या.
करिश्मा झाली भावूक
सलमानच्या त्या गाण्याची आठवण काढत करिश्मा कपूर भावूक झाली होती. ती म्हणाली, “खरं सांगायचं तर हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. मला आजही आठवतं, हे गाणं रिलीज झालं तेव्हा आम्ही सगळेच, दिवस-रात्र अनेक शिफ्टमध्ये काम करत होतो. सलमान प्रचंड थकलेला असायचा, पण कॅमेरा सुरू झाला की त्याची एनर्जी पाहण्यासारखी असायची. त्याचा स्वॅग, स्टाईल आणि स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्त होता. त्या गाण्यातसलमानची जागा दुसरा कोणीच घेऊ शकत नाही” अशा शब्दांत करिश्माने सलमानचं कौतुक केलं.
करिश्माने त्या काळातील शूटिंगच्या दिवसातील आठवणीही सांगितल्या. ती म्हणाली, ” तेव्हा एका दिवसात वेगवेगळ्या चित्रपटांच्या शूटिंगला जावं लागायचं. इतकं काम असूनही सलमानने कधी थकवा त्याच्या चेहऱ्यावर किंवा कामात दिसू दिला नाही. प्रत्येक शॉट त्याने तितक्याच जोशात दिला आणि म्हणूनच आजही ते गाणं पाहताना तीच एनर्जी जाणवते.” असं करिश्माने नमूद केलं.
‘ओ ओ जाने जाना’ हे तर आजंही अनेकांच आवडतं प्रेमगीत आहे, अनेक तरूणी सलमानच्या या गाण्यावर फिदा आहेत. या गाण्यात त्याचा शर्टलेस अवतार, थोडी फाटलेली जीन्स हे अनेकांना आवडलं, बराच काळ ते ट्रेंडमध्येही होतं.
‘प्यार किया तो डरना क्या’ ची स्टारकास्ट
दरम्यान 1998 साली आलेला ‘प्यार किया तो डरना क्या’ हा चित्रपट खूप गाजला आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. सलमान खान आणि काजोलची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. चित्रपटात त्या दोघांशिवाय, अरबाज खान, धर्मेंद्र, किरण कुमार आणि कुनिका सदानंद यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. विशेष म्हणजे, या चित्रपटाची गाणी आजही चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये कायम असतात.
