श्वेता तिवारी- सिझेन खानच्या अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्रीकडून खुलासा; म्हणाली..
'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील सहअभिनेता सिझेन खानसोबत अभिनेत्री श्वेता तिवारीचं अफेअर होतं, असा आरोप तिच्या पूर्व पतीने केला. या आरोपांवर आता त्याच मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे.

टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली श्वेता तिवारी तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी श्वेताचा पूर्व पती राजा चौधरीने एका मुलाखतीत तिच्यावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे आरोप केले होते. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील सहअभिनेता सिझेन खानसोबत तिचं अफेअर होतं, असं राजा म्हणाला होता. या आरोपांवर आता त्याच मालिकेत श्वेतासोबत काम केलेली अभिनेत्री शिवानी गोसाईंने प्रतिक्रिया दिली आहे. राजा चौधरी आणि श्वेता तिवारीने 1998 मध्ये लग्न केलं होतं. 2000 मध्ये श्वेताने मुलीला जन्म दिला. लग्नाच्या नऊ वर्षांनंतर 2007 मध्ये श्वेताने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तेव्हा श्वेताने राजावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. 2012 मध्ये हे दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले होते. तेव्हापासून मुलगी पलक श्वेतासोबतच राहते.
‘टेलीचक्कर’ला दिलेल्या मुलाखतीत शिवानीने राजाच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेच्या सेटवरील काही आठवणी सांगितल्या. सेटवर श्वेता नेहमीच चिंतेत दिसायची आणि शूटिंगदरम्यान ती कधी कधी भावूक व्हायची, रडायची, असं तिने सांगितलं. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे श्वेता दिवस-रात्र काम करायची. कधीकधी ती 36 तास काम करायची, असाही खुलासा शिवानीने केला.
View this post on Instagram
“सेटवर मी तिला बऱ्याचदा चिंतेत, तणावात पाहिलंय. कधी-कधी रडतानाही पाहिलंय. खरंतर हे तिचं खासगी आयुष्य आहे, त्यात मला काहीच बोलण्याचा अधिकार नाही. परंतु श्वेता तिच्या खासगी आयुष्यामुळे खूप त्रस्त असायची. एकेकदा तर ती दिवस-रात्र काम करायची. 36 – 36 तास काम करायची. तिचं बाळ लहान होतं. पती-पत्नीदरम्यान वाद झाल्याचंही आम्हाला कळत होतं. ती भाड्याचं घर शोधत होती, तेव्हा तिची आई मुलीचा सांभाळ करायची. नंतर ती जेव्हा भाडेतत्त्वावर दुसऱ्या घरात राहायला गेली, तेव्हासुद्धा तिचा संघर्ष दिसत होता. त्यावेळी ती खूप तरुण होती”, असं शिवानी म्हणाली.
श्वेता आणि सिझेनच्या नात्याबद्दल शिवानीने पुढे सांगितलं, “तुम्ही इतका संघर्ष आणि इतकी मेहनत करत असताना जर दुसरीकडून कम्फर्ट मिळत असेल तर शिफ्ट होणं सोपं जातं. सेटवर तुम्ही जास्त वेळ घालवता. त्यामुळे अनेकदा गोष्टींकडे चुकीच्या पद्धतीने पाहिलं जातं. कारण तुमचे सीन्स तसे असतात, तुम्ही एकमेकांसोबत हसता-खेळता, मस्करी करता. तुम्ही एकमेकांसोबत कम्फर्टेबल होत जाता. परंतु त्या दोघांमध्ये खरंच काही होतं का हे मला आजवर माहीत नाही.”
