सोनू निगमने भाडेतत्त्वावर दिली प्रॉपर्टी; महिन्याचं भाडं वाचून बोबडीच वळेल!
प्रसिद्ध गायक सोनू निगमने त्याची मुंबईतील एक जागा पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिली आहे. या जागेसाठी दर महिन्याला त्याला भरभक्कम रक्कम भाडं म्हणून मिळणार आहे. हे भाडं वाचून तुमची बोबडीच वळेल.

बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगमने अत्यंत हाय-प्रोफाइल प्रॉपर्टी डील केली आहे. मुंबईतील सांताक्रूझ इथली प्रीमिअम कमर्शिअल जागा त्याने भाडेतत्त्वावर दिली आहे. या जागेसाठी त्याला दर महिन्याला तब्बल 19 लाख रुपये भाडं मिळणार असल्याचं कळतंय. इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन (IGR) पोर्टलवरून ‘स्क्वेअर यार्ड्स’ने मिळवलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांनुसार, या कराराची औपचारिक नोंदणी डिसेंबर 2025 मध्ये झाली. गेल्या काही वर्षांत अनेक सेलिब्रिटींनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आणि त्यातून बराच नफा कमावला. सोनू निगमलाही त्याची कमर्शिअल जागा लीझवर दिल्याने मोठा आर्थिक फायदा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाडेतत्त्वावर दिलेली ही जागा ट्रेंड सेंटर बीकेसीमध्ये असून ती 4,257 चौरस फूटांवर पसरलेली आहे. करारानुसार, 3.27 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 1000 रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आलं आहे. तर 90 लाख रुपयांची सुरक्षा ठेव देखील भरण्यात आली आहे. हा करार पाच वर्षांसाठी करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या वर्षाचं भाडं दरमहा 19 लाख रुपये निश्चित करण्यात आलं आहे. तर दुसऱ्या वर्षी त्यात एक लाख रुपयांची वाढ करण्यात येईल. तिसऱ्या वर्षापासून भाडं वार्षिक 5 टक्क्यांनी वाढेल. म्हणजेच तिसऱ्या वर्षी सोनू निगमला 21 लाख रुपये, चौथ्या वर्षी 22.05 आणि पाचव्या वर्षी 23.15 लाख रुपये भाडं मिळेल.
या करारातून सोनू निगमला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. सोनू गेल्या 30 वर्षांहून अधिक काळापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. त्याने ‘सूरज हुआ मधम’, ‘कल हो ना हो’, ‘अभी मुझमें कही’ यांसारखी अनेक हिट गाणी गायली आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘परम सुंदरी’ या चित्रपटातील त्याचं ‘परदेसियाँ’ हे गाणं तुफान गाजलं. सोनू निगमला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.
संगीत श्रेत्रातील अमूल्य योगदानामुळे सोनू निगमला पद्मश्री, राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. सोनू निगमचं करिअर आणि त्याची गाणी अनेकांना माहित असली तरी त्याच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना फारसं माहीत नाही. वैयक्तिक आयुष्याबद्दल सोनू निगम फारसं व्यक्तही होत नाही. त्याची पत्नी मधुरिमासुद्धा प्रकाशझोतापासून लांबच राहणं पसंत करते. सोनू निगम आणि मधुरिमा यांची पहिली भेट एका कार्यक्रमात झाली होती. दोघांच्या वयात पाच वर्षांचं अंतर असूनही ते एकमेकांच्या प्रेमात पडले. काही काळ डेट केल्यानंतर या दोघांनी 15 फेब्रुवारी 2002 रोजी लग्न केलं.
